अनिल कांबळे,
नागपूर,
ashwini-dey-murder-case : चर्चेत असलेल्या अश्विनी ऊर्फ आशी डे हत्याकांडाच्या तपासात कन्हान पोलिसांना मोठे यश मिळाले असून, या प्रकरणातील मुख्य आरोपी मोनू उर्फ आशीष मनपिया याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने ११ ऑगस्टपर्यंत आरोपीला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी मोनू मनपिया आणि आशी डे यांच्यात दीर्घकाळ प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात सतत वाद सुरू होते. दोघेही एकमेकांवर मानसिक छळाचे आरोप करत असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वीही काही गुन्हे दाखल असल्याचे सांगितले जात आहे. तपासादरम्यान पोलिसांनी मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर), सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांचा आधार घेत आरोपीपर्यंत पोहोचले. चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली. सोमवारी पहाटे कन्हान नदीवरील पुलाखाली पाण्यात एका तरुणीचा मृतदेह आढळला होता. ओळख पटवल्यानंतर तो मृतदेह आशी डे हिचाच असल्याचे स्पष्ट झाले.
प्राथमिक तपासात तिची अन्यत्र हत्या करून मृतदेह नदीत फेकल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तिच्या संपर्कातील व्यक्तींची चौकशी सुरू केली आणि तपासाची दिशा आरोपीकडे वळली. मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रेमसंबंध, वैयक्तिक वाद, आर्थिक कारणे किंवा इतर कोणते कारण या हत्येमागे आहे का, याचा तपास सुरू आहे. तसेच हत्या नेमकी कुठे झाली?, मृतदेह नदीपर्यंत कसा आणला गेला? आणि या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग होता का?, याचाही शोध पोलिस घेत आहेत. शवविच्छेदन अहवाल, फॉरेन्सिक पुरावे आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.