मुथूट फिनकॉर्पचा शाखा व्यवस्थापक फरार

अमरावती येथील प्रकार गहाण सोन्याबाबत ग्राहक चिंतित

    दिनांक :04-Aug-2026
Total Views |
अमरावती, 
muthoot-fincorp : शहरातील कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उस्मानिया मशिदीसमोर असलेल्या मुथूट फिनकॉर्पच्या शाखेत मंगळवारी मोठी खळबळ उडाली. शाखा व्यवस्थापकाने ग्राहकांकडून गोल्ड लोनची संपूर्ण रक्कम वसूल करून ती कंपनीच्या खात्यात जमा न करता फरार झाल्याचा आरोप समोर आला. त्यानंतर मोठ्या संख्येने कर्जदार शाखेत धावले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कंपनीचे नागपूर येथील प्रादेशिक व्यवस्थापक अमरावतीत दाखल झाले असून कोतवाली पोलिसांनीही तपास सुरू केला आहे.
 
 
JKLJ
 
 
 
//कर्ज फेडले, पण कंपनीच्या नोंदीतच नाही
 
 
माहितीनुसार, अनेक ग्राहकांनी १९ ते ७१ ग्रॅमपर्यंत सोने गहाण ठेवून २ ते ५ लाख रुपयांपर्यंतचे गोल्ड लोन घेतले होते. त्यांनी कंपनीच्या खात्यात ऑनलाईन किंवा शाखा व्यवस्थापकाने सांगितलेल्या डिजिटल माध्यमातून नियमित हप्ते तसेच संपूर्ण कर्जाची परतफेड केली. मात्र, दोन महिन्यांत सुमारे ३५ ते ४० ग्राहकांकडून वसूल झालेली रक्कम कंपनीच्या नोंदीत जमा करण्यात आली नसल्याचा आरोप आहे. ग्राहकांनी चौकशी केल्यावर तांत्रिक अडचणीचे कारण सांगून त्यांना वारंवार टाळण्यात आल्याचेही समोर आले.
 
 
//२७ पेक्षा जास्त तक्रारी
 
साेमवारी शाखा व्यवस्थापक कार्यालयात अनुपस्थित असल्याचे आणि त्याचा मोबाईलही बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर संतप्त ग्राहकांनी कोतवाली पोलिस ठाण्यात धाव घेतली. मंगळवारी सुद्धा मोठ्या संख्येने ग्राहक शाखेत जमा झाले. विशेषतः ज्यांनी संपूर्ण कर्ज फेडले आहे, त्यांना कंपनीच्या सॉफ्टवेअरमध्ये भरलेली रक्कम दिसत नसल्याने गहाण ठेवलेले सोने सुरक्षित आहे का, याची भीती सतावत आहे. आतापर्यंत २७ हून अधिक ग्राहकांनी अशाच प्रकारच्या तक्रारी दाखल केल्या आहेत.
 
 
पोलिसांचा तपास वेगात
 
 
या प्रकरणाची गंभीर दखल घेत सहायक पोलिस आयुक्त संजय खताळे यांनी कंपनीच्या नागपूर येथून आलेल्या प्रादेशिक व्यवस्थापकासह चार जणांची चौकशी केली. प्राथमिक तपासात कंपनीच्या काही संगणकांमधील डेटा डिलिट झाल्याची माहिती समोर आली आहे. ऑडिटनंतर नेमक्या किती ग्राहकांची फसवणूक झाली, हे स्पष्ट होणार असून त्यानंतर सर्व पीडितांचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, वृत्त लिहीपर्यंत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.