‘कॅशलेस पेट्रोकार्ड’मुळे १०२ रुग्णवाहिका होणार ‘अपडेट’

- गोंदिया जिल्ह्यातील २४ आरोग्य संस्थांना लाभ ः इंधन व्यवस्थापन होणार डिजिटल

    दिनांक :04-Aug-2026
Total Views |
गोंदिया, 
cashless-petro-card : राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक तंत्रस्नेही, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने १०२ रुग्णवाहिका सेवेसाठी ‘कॅशलेस पेट्रोकार्ड’ या नाविन्यपूर्ण सुविधेचा शुभारंभ ३० जुलै रोजी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते मुंबईतील आरोग्य सेवा आयुक्तालयात करण्यात आला. या सुविधेमुळे राज्यातील ३ हजार १९५ रुग्णवाहिकांच्या इंधन व्यवस्थापनात पारदर्शकता येण्यासोबतच रुग्णवाहिका सेवा अपडेट होणार आहे. यात गोंदिया जिल्ह्यातील तीन तालुक्यातील २४ आरोग्य संस्थेत ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
 
 
 
cashless-petro-card
 
 
 
राज्यातील शासकीय वाहनांना वेळेवर इंधन उपलब्ध करून देताना येणार्या अडचणी लक्षात घेऊन आरोग्यमंत्री आबिटकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. दरम्यान, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल)च्या माध्यमातून राज्यातील ३ हजार १९५ रुग्णवाहिकांना ‘कॅशलेस पेट्रोकार्ड’ देण्यात येणार असून त्यामुळे रुग्णवाहिकांमध्ये इंधन भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल होणार आहे. या उपक्रमाचा लाभ गोंदिया जिल्ह्यातील २४ आरोग्य संस्थांना मिळणार असून यात सालेकसा, देवरी आणि गोरेगाव तालुक्यातील १८ प्राथमिक आरोग्य केंद्रांसह ६ ग्रामीण रुग्णालयांना एचपीसीएलचे पेट्रोकार्ड वितरित करण्यात येणार आहेत. तर उर्वरित आरोग्य संस्थांनाही टप्प्याटप्प्याने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णवाहिकांना इंधनासाठी येणार्या अडचणी कमी होऊन आपत्कालीन सेवा अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी १०२ रुग्णवाहिका सेवा प्रामुख्याने माता व बालकांसाठी मर्यादित होती. मात्र, आता ही सेवा सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सेवा अधिक सक्षम आणि प्रभावी करण्यासोबतच भविष्यात १०८ रुग्णवाहिका सेवेला पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनेही शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
रुग्णवाहिका व्यवस्थापनात होणार बदल ...
 
 
अत्याधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल इंधन व्यवस्थापन आणि प्रभावी मॉनिटरिंगच्या माध्यमातून नागरिकांना जलद, विश्वासार्ह आणि दर्जेदार आपत्कालीन आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. एचपीसीएलच्या सहकार्याने सुरू झालेली ‘कॅशलेस पेट्रोकार्ड’ सुविधा राज्याच्या रुग्णवाहिका व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणारी ठरणार आहे.
 
 
जिल्ह्यातील ६ ग्रामीण रुग्णालयांसह सालेकसा, देवरी व सडक अर्जुनी तालुक्यातील १८ प्राथमीक आरोग्य केंद्रांचा समावेश या उपक्रमात करण्यात आला असून उर्वरीत संस्थांचा टप्प्या-टप्प्याने समावेश करण्यात येईल.
- अभिजित गोल्हार, जिल्हा आरोग्य अधिकारी, गोंदिया