उदयनिधींना न्यायालयाचा दिलासा

अभिनेत्री त्रिशा प्रकरणी जामीनावर सोडण्याचा आदेश

    दिनांक :04-Aug-2026
Total Views |
चेन्नई,
court grants relief to udhayanidhi द्रमूक नेते उदयनिधी स्टॅलिन यांना अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. जामीन अर्जावर सुनावणी करताना मद्रास उच्च न्यायालयाने उदयनिधी यांना चौकशीनंतर आजच पोलिस ठाण्यातून जामिनावर सोडण्याचे आदेश दिला आहे. उदयनिधी यांना अटक करून चौकशीसाठी तंजावरला नेल्यानंतर काही तासांतच हा आदेश आला.
 
 
court grants relief to udhayanidhi
 
सुनावणीदरम्यान, तामिळनाडू सरकारच्या महाधिवक्त्यांनी न्यायालयाला माहिती दिली की, महिलांनी दाखल केलेल्या तक्रारींच्या आधारे द्रमूक नेत्याला ताब्यात घेण्यात आले असून तपास पूर्ण झाल्यावर त्यांची सुटका केली जाईल. न्यायालयाने पोलिसांना मंगळवारीच चौकशी पूर्ण करण्याचे आणि ती दुसऱ्या दिवसापर्यंत वाढवू नये, असे निर्देश दिले. न्यायाधीशांनी कायद्यानुसार, चौकशीनंतर उदयनिधी यांना तत्काळ पोलिस ठाण्यात जामिनावर सोडण्याचे आदेश दिले. तसेच त्यांचा जामीन अर्जही मंजूर करत त्यांना सुरू असलेल्या तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे व तपासातील सर्व आवश्यकतांचे पालन करण्याचे निर्देश दिले.
 
राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रारीनंतर कारवाई
तामिळनाडू विधानसभेतील विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांना अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्या विरोधात केलेल्या कथित वक्तव्याप्रकरणी त्यांना मंगळवारी अटक करण्यात आली. मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांचा पक्ष टीव्हीकेने पोलिस आणि राष्ट्रीय महिला आयोगाकडे (एनसीडब्ल्यू) तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. स्टॅलिन यांच्या अटकेपूर्वी त्यांच्या निवासस्थानी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उदयनिधी यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर टीव्हीकेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याची घोषणा केली होती.