धर्मो रक्षति रक्षितः

    दिनांक :04-Aug-2026
Total Views |
अग्रलेख
dharma rakshati rakshitah कोणत्याही प्रलोभनाद्वारे किंवा फसवणुकीने धर्मांतर घडवून आणणाऱ्या प्रवृत्ती सामाजिक वीण बिघडविण्यास कारणीभूत ठरतात असे अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळे, धर्मांतर ही सांस्कृतिक घडी बिघडविणारी कृती आहे, हे एकदा मान्य केले, की आपोआपच प्रत्येकास आपल्या धर्माचे आचरण करण्याचा हक्क अबाधित राखता येतो. प्रलोभने दाखवून किंवा बळाचा, पैशाचा वापर करून किंवा निव्वळ काही रूढींच्या गैरवापरामुळे निर्माण झालेल्या समजुतींचा धाक दाखवून धर्मांतरे घडविण्याचे प्रकार केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात अनेक राज्यांमध्ये घडले असले, तरी अशा धर्मांतराने कोणाचेच काही भले झाल्याची उदाहरणे नाहीतच, उलट समाजाचे स्वास्थ्य बिघडण्यापलीकडे अशा धर्मांतरातून काहीही साध्यदेखील झालेले नाही. त्यामुळे, अशा रीतीने धर्मांतरे घडवून आणण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि आपल्या पारंपरिक जीवनशैलीने आखून दिलेली जीवनाची वाटचाल निर्धोकपणे करण्यासाठी अशा कृतींना पायबंद घालणे गरजेचेच होते.
 
 

धर्मो रक्षति रक्षितः 
 
त्यामुळेच, महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा, किंवा सक्तीच्या धर्मांतरविरोधातील कायदा संमत झाला ही राज्याच्या कायदेशीर व राजकीय पटलावरील अत्यंत महत्त्वपूर्ण बाब ठरली आहे. या कायद्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्याने आता राज्यात सर्वांनाच मुक्तपणे व निर्भयतेने आपल्या धर्माचे आचरण करता येईल. अर्थात, बळजबरीने किंवा आमिष दाखवून होणाऱ्या धर्मांतराला आळा घालण्याच्या उद्देशाने आणलेल्या या कायद्याभोवती मोठे सामाजिक व राजकीय वादंग निर्माण झाले असले, तरी त्यामागील राजकीय हेतू नजरेआड करून सांस्कृतिक, पारंपरिक आणि सामाजिक जीवनशैलीशी निगडीत असलेल्य पैलूंचा विचार केल्यास, हा कायदा अस्तित्वात येणे ही जीवनशैली अबाधित राखण्यासाठीची गरजच होती यामध्ये दुमत असणार नाही.
मानवी जीवन ही केवळ कौटुंबिक कर्तव्यांची किंवा जगण्याच्या संघर्षातील रोजच्या धावपळीची केवळ एक साखळी नसते. जीवनशैलीला अर्थ प्राप्त करून देणाऱ्या संस्कृती नावाच्या एका अदृश्य धाग्याने या जीवनशैलीला बांधलेले असते, आणि धर्म हा संस्कृतीचा आत्मा असतो असे म्हटले जाते. धर्माचरणाचे नाते थेट जीवनशैलीशी जोडले गेलेले असल्याने, आजच्या रूढ अर्थाने ज्याकडे कर्मकांड किंवा पूजापठानापुरतेच पाहिले जाते, त्याहूनही धर्म या संकल्पनेचा अर्थ व्यापक आहे. आजकाल, धर्माबाबतच्या काही संकुचित समजुतींमुळे, केवळ कर्मकांड किंवा उपासनापद्धतींचे आचरण म्हणजे धर्माचरण असे मानले जात असले, तरी ही ते खरे नाही. धर्म ही केवळ पूजा पद्धती नाही, तर संपूर्ण समाजात शिस्त, दिशा आणि अर्थ देणारी ती एक जीवनशैली आहे. धर्म विचार पेरतो, तर संस्कृती ते विचार आचरणात आणण्याचे संस्कार घडविते. या दोन्ही बाबी जेव्हा एका विशिष्ट शिस्तीत अंमलात आणल्या जातात, तेव्हा धर्म आपल्या जीवनशैलीत श्वासासारखा मिसळून जातो. असे धर्माचरण, संस्कृती आणि जीवनशैली यांच्यातील परस्पर संबंध समाजाच्या वाटचालीत प्रत्येक पावलावर जाणवतो. सण, उत्सव साजरे करण्यामागील काही शास्त्रीय कारणे पाहिली, तर धर्माच्या संस्काराचे सामाजिक महत्व स्पष्ट होते. त्यामुळे, धर्म ही केवळ जीवनशैलीशी नव्हे, तर भौगोलिकतेशीदेखील जोडली गेलेली बाब ठरते. पाश्चात्य देशांतील धर्माचरणाच्या परंपरा येथील भोगोलिकतेशी जुळतीलच असे नसते. सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशाचा सोहळा साजरा करण्यासाठी साजरा करावयाच्या सणाच्या दिवशी तिळाचे पदार्थ का खावेत, यामागील आरोग्याची आणि कालवैशिष्ट्याची कारणे स्पष्ट असतात. शेतीप्रधान देशात निसर्ग आणि पशुपूजेला धार्मिक परंपरेचे स्थान दिले जाते. या देशात सूर्योपासना आणि पशुपूजन हे धार्मिक विधी मानले जातात, आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. ढोबळपणे पाहता, यास धार्मिक विधी मानले जात असले, तरी त्या परंपरांना संस्काराची शिकवण आहे, आणि हे संस्कार धर्मपालनातून जपले गेले आहेत. सण साजरा करणे ही संस्कृती आहे आणि ऋतूनुसार आहार बदलून निसर्गाशी जुळवून घेणे ही आपली आरोग्यदायी जीवनशैली आहे. आहार आणि सामाजिक आचार, विचारांवरही येथे धार्मिक संस्काराचा प्रभाव दिसून येतो. धर्माच्या संस्काराची शिकवण म्हणून सांगितली जाणारी प्रत्येक गोष्ट माणसाला निसर्गाशी आणि कुटुंबाशी जोडून ठेवणारी जीवनपद्धती शिकवते, हे भारतीय संस्कृतीशी जवळचे नाते असलेल्या धर्माने दाखवून दिले आहे.
त्यामुळे, धर्म ही कोणतीही लादली जाणारी गोष्ट नाही. मानवी समाजाला एकत्र बांधून ठेवणारी आणि त्याला सांस्कृतिक अधिष्ठान देणारी ती एक नैसर्गिक गरज आहे. ज्या संस्कृती आपल्या धार्मिक व सांस्कृतिक मुळांपासून दूर गेल्या त्यांनी आपली सामाजिक ओळख आणि नैतिक पाया गमावला असे जागतिक समाजव्यवस्थेत दिसून येते. त्यामुळे, संस्कृती आणि धर्माचे रक्षण करणे म्हणजे एका समृद्ध जीवनशैलीचा वारसा आपल्या भावी पिढ्यांसाठी जतन करणे ही भारताच्या संस्कृतीची शिकवण आहे. धर्म ही मानवी समाजाला बांधून ठेवणारी, त्याला एक अधिष्ठान देणारी आणि कालौघात विकसित झालेली एक समृद्ध जीवनशैली आहे. कोणत्याही जिवंत समाजाची संस्कृती, परंपरा, सण-उत्सव, जीवनमूल्ये आणि सामाजिक आचार-विचार हे त्याच्या धर्माच्या पायावरच रचलेले असतात. म्हणूनच, धर्म आणि संस्कृती यांचा संबंध अविभाज्य आहे. जेव्हा धर्माची मुळे निखळतात, तेव्हा त्याच्याशी जोडलेली संस्कृतीही ढासळते. यामुळे, प्रलोभने, फसवणूक किंवा बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराला अटकाव करणे ही केवळ एक कायदेशीर बाब उरत नाही, तर ती कोणत्याही समाजाची सांस्कृतिक आणि सामाजिक स्वायत्तता टिकवून ठेवण्यासाठीची एक अपरिहार्य गरज बनते.
कारण, कोणत्याही राष्ट्राच्या, समाजाच्या संस्कृतीचा प्रवाह पिढ्यानपिढ्यांच्या जगण्यातून, निसर्गाशी असलेल्या सहसंबंधातून आणि धार्मिक आचरणातून तयार होत असतो. भाषा, सण, साहित्य हे सारे जीवनपद्धतीचे अविभाज्य घटक आहेत. त्यामुळे, जेव्हा एखाद्या व्यक्ती, कुटुंब किंवा समूहाचे सक्तीने किंवा प्रलोभने दाखवून फसवणुीने धर्मांतर घडविले जाते, तेव्हा अशा व्यक्ती, कुटुंबे किंवा समूहांची केवळ प्रार्थना किंवा पूजापद्धती बदलत नाही, तर त्यांच्या परंपरा, संस्कृतीशी जोडली गेलेली पिढ्यापिढ्यांची नाळ तोडली जात असते, आणि जेव्हा संस्कृतीशी असलेले नाते तोडले जाते, तेव्हा त्या समाजाच्या अस्मितादेखील कमजोर होतात, हा इतिहास आहे. जेव्हा एखादा समाज आपल्या मूळ संस्कृतीपासून तुटतो, तेव्हा त्याची सामाजिक ओळखही पुसली जाते. म्हणूनच, धर्मांतरबंदीचा कायदा ही त्या सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाचे रक्षण करणारी संरक्षक ढाल ठरणार आहे. समाज जेव्हा एका सामायिक सांस्कृतिक धाग्याने बांधलेला असतो, तेव्हा त्यात एकोपा आणि परस्परविश्वास टिकून राहतो. संघटित आणि आक्रमक धर्मांतराच्या मोहिमांमुळे या सामाजिक रचनेला तडे जातात. सामाजिक सलोखा धोक्यात येतो. कौटुंबिक विघटन आणि सामाजिक तणाव वाढू लागतो. म्हणूनच, सामाजिक स्थिरता आणि शांतता अबाधित राखण्यासाठी धर्मांतरावर कायदेशीर बंधने असणे आवश्यक ठरते.
भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माचे आचरण करण्याचे आणि त्याचा प्रसार करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. परंतु, असे स्वातंत्र्य म्हणजे धर्मपरिवर्तन करण्याचा परवाना नसतो. जिथे अज्ञानाचा, गरिबीचा, आजारपणाचा किंवा आर्थिक लाचाचा फायदा घेऊन धर्मांतर घडवले जाते, तिथे ते स्वातंत्र्य राहत नाही, तर तो एक प्रकारचा शोषणाचा मार्ग बनतो. बळजबरीने किंवा आमिष दाखवून केलेले धर्मांतर हे व्यक्तीच्या स्वेच्छेचा पराभव करते. अशा अनैतिक मार्गांना आळा घालणे म्हणजे खऱ्या अर्थाने नागरिकांच्या धार्मिक स्वातंत्र्याचे रक्षण करणे ठरते.dharma rakshati rakshitah या कायद्याने आता ही जबाबदारीदेखील संबंधित यंत्रणांच्या खांद्यावर दिली आहे. जगातील अनेक समाज आणि संस्कृती केवळ धर्मांतराच्या वादळात आपल्या मूळ अस्तित्वासह नामशेष झाल्या. आपल्या मूळ संस्कृतीशी आणि धर्माशी नाळ टिकवून ठेवली, तर काळाच्या ओघात आपले अस्तित्व सिद्ध करता येईल, हा विचार स्वीकारला, की धर्म ही केवळ वैयक्तिक बाब राहात नाही. ती एक सामाजिक गरज ठरते. त्यामुळे अनैतिक, छुप्या आणि बळजबरीच्या धर्मांतर पद्धतींच्या विरोधात अंमलात येणाऱ्या या कायद्याची गरज आहे. महाराष्ट्राने ती गरज ओळखल्याने राज्याचच्या सामाजिक आणि सांस्कृतिकतेचे भविष्य सुरक्षिततेच्या भावनेने आश्वस्त झाले आहे. आपली संस्कृती, आपला इतिहास, आपल्या परंपरा आणि आपली सामाजिक रचना सुरक्षित ठेवण्यासाठी अशा कायद्याची कडक अमलबजावणी होणे अत्यंत गरजेचे आहे. धर्म आणि संस्कृतीचे रक्षण करणे म्हणजे केवळ भूतकाळाचा अभिमान बाळगणे नव्हे, तर आपल्या भावी पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करणे होय. म्हणूनच, धर्मांतरबंदी ही केवळ एक कायद्याची गरज नसून, ती आपल्या समाजाची आत्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक गरज आहे.