दक्षिणेकडील राज्यात मोठा राजकीय भूकंप

द्रमुक नेते स्टॅलिन यांना घरातूनच उचलले

    दिनांक :04-Aug-2026
Total Views |
चेन्नई,
dmk leader stalin picked up from his home तामिळनाडूच्या राजकारणात सध्या प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री त्रिशा आणि मुख्यमंत्री विजय यांच्याविरोधात आक्षेपार्ह आणि अपमानास्पद टिप्पणी केल्याच्या आरोपावरून चेन्नई पोलिसांनी द्रमुक नेते उदयनिधी स्टालिन यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. या कारवाईनंतर चेन्नईतील वातावरण कमालीचे तापले असून ठिकठिकाणी निदर्शने सुरू झाली आहेत.
 
dmk leader stalin
 
पोलिस बंदोबस्त आणि कार्यकर्त्यांचा गोंधळ
उदयनिधी स्टालिन यांच्यावर कारवाई होणार असल्याचे समजताच, त्यांच्या चेन्नई येथील घराबाहेर सुरक्षेचा प्रचंड मोठा ताफा तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी घातलेले सुरक्षेचे कडे तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक द्रमुक समर्थकांना पोलिसांनी आधीच ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी थेट उदयनिधी यांच्या घरात प्रवेश करून त्यांना ताब्यात घेतले. उदयनिधी यांना घेऊन जाणाऱ्या ईसीआर रस्त्यावर द्रमुक समर्थकांनी मोठा रस्ता रोको केला असून पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. सध्या पोलीस रस्त्यावरील आंदोलकांना हटवून वाहतूक आणि परिस्थिती पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
 
उदयनिधी यांनी अभिनेत्री त्रिशा यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सत्ताधारी ‘टीव्हीके’ पक्षाने तीव्र संताप व्यक्त केला होता. टीव्हीके नेत्यांनी याविरोधात राज्यभर मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला होता, तर भाजपानेही उदयनिधी यांच्या तात्काळ अटकेची मागणी लावून धरली होती. राजकीय दबाव वाढल्यामुळे अखेर पोलिस प्रशासनाला ही कारवाई करावी लागली.
 
नक्की काय घडले होते?
तंजावूर येथे कावेरी जलविवादाच्या मुद्यावर आयोजित करण्यात आलेल्या एका निषेध सभेत उदयनिधी स्टालिन भाषण करत होते. कावेरीच्या पाण्याचा एक थेंबही तामिळनाडूला मिळाला नाही, असा आरोप करत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. मात्र, याच भाषणादरम्यान जमावातून काहींनी ‘त्रिशा, त्रिशा‘ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. उदयनिधी यांनी आपले भाषण थांबवून त्या घोषणांवर एक टिप्पणी केली, जी अत्यंत आक्षेपार्ह आणि अश्लील अर्थाची असल्याचे निष्पन्न झाले. अतिरिक्त पोलीस आयुक्त नरेंद्रन नायर यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी उदयनिधी यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला असून त्यानुसारच ही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.