डॉ. डी. वाय. पाटील यांचे कार्य भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

उत्तर-पूर्व राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणल्याचा राज्यपालांकडून आवर्जून उल्लेख

    दिनांक :04-Aug-2026
Total Views |
मुंबई,
governor jishnu dev varma त्रिपुरा व बिहारचे माजी राज्यपाल आणि शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल राज्याचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. 'डॉ. पाटील यांनी उत्तर-पूर्व राज्यातील अनेक गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे ऐतिहासिक कार्य केले', अशा शब्दांत राज्यपालांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
 
governor jishnu dev varma
 
डॉ. डी. वाय. पाटील हे त्रिपुराचे राज्यपाल असताना त्यांच्याशी आपला घनिष्ठ परिचय झाला होता. त्रिपुरा तसेच बिहार राज्यांचे राज्यपाल म्हणून कार्य करताना डॉ. पाटील यांनी आपल्या विनम्र आचरणाने आणि सौजन्यशील स्वभावाने राज्यपाल पदाची प्रतिष्ठा अधिकच वाढवली, असे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. ते एक द्रष्टे शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांनी महाराष्ट्र आणि देशाच्या इतर भागांमध्ये उच्च व व्यावसायिक शिक्षणाच्या अनेक गुणवत्तापूर्ण संस्था उभारल्या. मागील तीन दशकांहून अधिक काळ या शिक्षण संस्थांनी लाखो विद्यार्थी घडवले आहेत. हे विद्यार्थी आज विविध क्षेत्रांमध्ये आपले बहुमूल्य योगदान देत आहेत, असे डॉ. पाटील यांच्या शैक्षणिक योगदानाविषयी बोलताना राज्यपाल म्हणाले.
 
 
तसेच, समाजकारण, राजकारण आणि शिक्षण क्षेत्रात डॉ. डी. वाय. पाटील यांनी केलेले उत्तुंग कार्य भावी पिढ्यांसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त करत राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी त्यांच्या स्मृतीस विनम्र श्रद्धांजली अर्पण केली आणि पाटील कुटुंबियांप्रती आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या.