स्क्रीनचा अतिवापर ठरतोय मणक्याचा शत्रू; 'टेक नेक'चा वाढता धोका किती गंभीर?

    दिनांक :04-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
tech neck स्मार्टफोन, टॅबलेट आणि लॅपटॉप हे आजच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनले असले, तरी त्यांचा दीर्घकाळ आणि चुकीच्या पद्धतीने वापर केल्यामुळे मणक्याशी संबंधित गंभीर समस्या वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. विशेषतः मान खाली झुकवून मोबाईल वापरण्याची सवय किंवा पलंगावर पडून अथवा मांडीवर लॅपटॉप ठेवून काम करण्याची पद्धत शरीराच्या नैसर्गिक ठेवणीवर परिणाम करते. या स्थितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्येला वैद्यकीय भाषेत 'टेक नेक' असे म्हटले जाते.
 

tech neck 
 
 
तज्ज्ञांच्या मते, मान सरळ ठेवण्याऐवजी सतत पुढे झुकवली गेल्यास मानेच्या स्नायूंवर आणि पाठीच्या कण्यावर अतिरिक्त भार पडतो. मान आणि खांदे एका सरळ रेषेत असणे ही शरीराची नैसर्गिक स्थिती मानली जाते. मात्र, स्क्रीनकडे पाहण्यासाठी मान पुढे झुकल्यास गुरुत्वाकर्षणाचा परिणाम वाढतो आणि मानेच्या स्नायूंना जास्त ताण सहन करावा लागतो. याचा परिणाम केवळ मानदुखीपुरता मर्यादित राहत नाही, तर खांदे, वरचा पाठीचा भाग, मनगट आणि डोळे यांनाही त्याचा फटका बसतो.
सतत स्क्रीनकडे टक लावून पाहिल्यामुळे डोळ्यांची उघडझाप कमी होते. त्यामुळे डोळ्यांतील नैसर्गिक ओलावा कमी होऊन डोळे कोरडे पडणे, जळजळ होणे, धूसर दिसणे आणि डोळ्यांचा थकवा जाणवणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्याचवेळी एकाच स्थितीत फोन धरून ठेवण्यामुळे हातांच्या नसांवर दाब येतो. परिणामी मनगट, अंगठा आणि बोटांमध्ये वेदना, मुंग्या येणे किंवा अशक्तपणा जाणवू शकतो.
वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात की, मान सरळ असताना मानेवर साधारण पाच किलो इतका भार असतो. मात्र, मान १५ अंशांनी पुढे झुकल्यास हा भार सुमारे १२ किलोपर्यंत वाढतो. ४५ अंशांपर्यंत मान झुकल्यास मानेवर जवळपास २२ किलो, तर ६० अंशांपर्यंत झुकल्यास तब्बल २७ किलो इतका ताण पडू शकतो. दीर्घकाळ अशी स्थिती राहिल्यास मणक्याच्या नैसर्गिक रचनेत बदल होण्याचा तसेच सर्व्हायकल डिस्क हर्निएशनसारख्या गंभीर समस्या उद्भवण्याचा धोका वाढतो.
'टेक नेक'ची सुरुवात अनेकदा किरकोळ लक्षणांनी होते. मान ताठ होणे, सतत दुखणे, खांदे आखडणे, वरच्या पाठीत वेदना, वारंवार डोकेदुखी, हात किंवा दंडामध्ये मुंग्या येणे ही त्याची सुरुवातीची लक्षणे मानली जातात. ही लक्षणे दीर्घकाळ कायम राहिल्यास किंवा हातात बधिरपणा, अशक्तपणा जाणवू लागल्यास तसेच दैनंदिन कामे किंवा झोप यावर त्याचा परिणाम होत असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
तज्ज्ञांच्या मते, या समस्येपासून बचाव करण्यासाठी स्क्रीन शक्यतो डोळ्यांच्या पातळीवर ठेवावी. संगणकाचा मॉनिटर डोळ्यांपेक्षा किंचित खाली असावा आणि प्रत्येक १० ते १५ मिनिटांनी बसण्याची स्थिती बदलणे किंवा शरीर ताठ करून स्ट्रेचिंग करणे फायदेशीर ठरते. फोन किंवा टॅबलेट वापरताना स्टँडचा वापर केल्यास मानेवरील ताण कमी होण्यास मदत होते. मान आणि खांद्यांचे नियमित व्यायामही तितकेच महत्त्वाचे आहेत. मान हळूहळू डावीकडे-उजवीकडे आणि वर-खाली फिरवणे, खांद्यांना गोलाकार हालचाल देणे तसेच हनुवटी छातीकडे हलकेच ओढण्याचा व्यायाम केल्यास स्नायूंवरील ताण कमी होऊ शकतो.
तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे 'टेक नेक'बरोबरच कार्पल टनेल सिंड्रोम, 'पिंकी स्ट्रेन' आणि 'थंब टेंडिनायटिस' यांसारख्या समस्या देखील वाढताना दिसत आहेत. सतत फोन हातात धरणे, दीर्घकाळ टायपिंग करणे किंवा मोबाईल गेम्स खेळणे यामुळे मनगट, अंगठा आणि बोटांवरील ताण वाढतो.tech neck त्यामुळे योग्य बसण्याची पद्धत, वेळोवेळी विश्रांती आणि उपकरणांचा संतुलित वापर या सवयी अंगीकारणे, हेच मणका आणि स्नायूंचे आरोग्य दीर्घकाळ टिकवून ठेवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.