भंडारा,
bhandara-news : देशात दोनदा कर्जमाफी देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एकमेव सरकार आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने अनेक कल्याणकारी निर्णय घेत खऱ्या अर्थाने शेतकरी जपण्याचे काम राज्य सरकार करीत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांसाठी मोठा आधार असल्याचे मत विधान परिषद सदस्य संजय भेंडे यांनी व्यक्त केले.

राज्य शासनाच्या वतीने जाहिर करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेच्या निमित्ताने या संदर्भात संवाद साधण्यासाठी भाजपाच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. संजय भेंडे बोलत हाते. समाजातील प्रत्येक वर्गातील नागरिक कसा सुखी आणि समाधानी होईल, यासाठी राज्य शासन काम करीत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यातील शेतकरी बांधवांना दोनदा कर्जमाफी मिळाली. छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेत पहिल्यांदा ३८ हजार कोटींचे कर्ज माफ केले गेले होते. आता या कार्यकाळात झालेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना ४२ हजार कोटींची आहे. राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या डोक्यावरील कर्जाचा भार कमी करण्यासाठी ही योजना मैलाचा दगड ठरणार आहे. ज्यांनी नियमीत कर्जफेड केली असेल, त्यांनाही प्रोत्साहनपर अनुदान देत त्यांच्या प्रामाणिपणाचा सन्मान केला जाणार असल्याचे भेंडे म्हणाले.
आज या योजनेमुळे लाखो शेतकरी कर्जमुक्त होणार आहे. केवळ कर्जमाफी करुन थांबवणारे हे सरकार नसून महिलांना शेतकऱ्यांचा दर्जा देण्यासाठी मिहला शेतकरी सक्षमीकरण विधेयक सरकारने पारीत केले. कृषी पंपाची वीज माफ केली. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून सिंचनाची मोठी व्यवस्था उभी करण्याचे काम सरकारने केले. राज्यातील ५२ टक्के अवर्षणप्रवण असलेल्या भागातील दूष्काळ दूर करण्यासाठी वैनगंगा नळगंगा जोड प्रकल्प, नवीन २४ धरणांची निर्मिती आणि जून्या १६ धरणांची दूरुस्ती केली गेली आहे. भविष्यातही ६ लाख कोटींच्या सिंचन कामांचे नियोजन असून यामुळे महाराष्ट्र दूष्काग्रस्तच्या व्याखेतून बाहेर निघणार असल्याचे आ. भेंडे म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुतीचे सरकार आज शेतकरी नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांसाठीही विविध योजनांच्या माध्यमातून आधार देण्याचे काम करीत आहे. तळागाळातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा भगीरथ प्रयत्न देवाभाउंच्या नेतृत्वात सुरु असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना त्याचे द्योतक आहे. आज विरोधक काहीही टिका करीत असले तरी महायुती सरकाराने कर्जमाफी आणि विषयांच्या माध्यमातून शेतकरी हित जपले आणि निवडणूकीत केलेल्या वचनांचे पालन केले, असेही आ. संजय भेंडे म्हणाले. पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष आशु गोंडाणे, भंडाऱ्याच्या नगराध्यक्षा मधूरा मदनकर, मयुर बिसेन, कल्याण निखाडे, उपनगराध्यक्षा भोपे, भगवान चांदेवार, चैतन्य उमाळकर उपस्थित होते.