प्रशासकीय दुर्लक्षाचा शेतकऱ्यांना फटका

पूल व रपट्यांजवळील अडथळे ठरले पूरस्थितीचे कारण

    दिनांक :04-Aug-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
administrative-negligence : घाटंजी तालुक्यातील कोळी (खु), कोळी (बु) व ताडसावळी या गावांना भाजपाचे देवानंद पवार यांनी भेट देऊन अतिवृष्टीने वाहून, खरडून गेलेल्या शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली. नदी-नाल्यांच्या काठावरील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे यावेळी निदर्शनास आले.
 
 
y4Aug-Devanand
 
तीन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने नदी-नाल्यांमधून पुराच्या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात वाळून पडलेली, तुटलेली व पडझड झालेली झाडे-झुडपे, विविध प्रकारचा केरकचरा वाहून आला. ही सामग्री गावांजवळील पूल, रपटे व पुलांच्या खांबांमध्ये अडकल्याने पाण्याचा नैसर्गिक प्रवाह रोखला गेला. परिणामी पाण्याची पातळी झपाट्याने वाढून अनेक ठिकाणी पाणी शिरले.
 
 
या संदर्भात प्रशासनाला यापूर्वीच संभाव्य धोका लक्षात आणून देण्यात आला होता. मात्र पूल व रपट्यांजवळ अडकलेली झाडे, लाकडे व इतर अडथळे वेळेत हटविण्यात आले नाहीत. परिणामी पूरस्थिती अधिक गंभीर बनली आणि त्याचा फटका शेतकरी व नागरिकांना बसला, अशी खंत देवानंद पवार यांनी व्यक्त केली.
 
 
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग व संबंधित यंत्रणांनी पूल व रपट्यांजवळील अडथळे दूर करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून स्वतंत्र आर्थिक तरतूद करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
 
 
पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी विकास मीना यांनी या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्राधान्य द्यावे, संबंधित विभागांना आवश्यक निर्देश द्यावेत आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी कायमस्वरूपी कार्यपद्धती निश्चित करावी. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतपिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकèयांना भरीव आर्थिक मदत मिळण्यासाठी शासनाकडे त्वरित प्रस्ताव पाठवावे, अशी मागणी देवानंद पवार यांनी केली.
 
 
यावेळी घाटंजी पंचायत समितीचे माजी सभापती शैलेश इंगोले व घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सय्यद छब्बू उपस्थित होते.