शेतकर्‍यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट

शेतजमिनी अधिग्रहित न करण्याची मागणी

    दिनांक :04-Aug-2026
Total Views |
गडचिरोली,
farmers met the vice president सहा खासदारांच्या शिष्टमंडळासह गडचिरोली जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात नवी दिल्ली येथे भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील कोणत्याही प्रकल्पासाठी शेतजमिनी अधिग्रहित करू नयेत, अशी मागणी त्यांनी केली.
 
 
farmers met the vice president
 
गडचिरोली तालुक्यातील हिरापूर-गुरुवळा परिसरात प्रस्तावित विमानतळासाठी होणार्‍या जमीन अधिग्रहणाला स्थानिक शेतकर्‍यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. तसेच चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील 14 गावांमध्ये तसेच जयरामपूर परिसरातील 13 गावांतील एमआयडीसी प्रकल्पांसाठी होणार्‍या जमीन अधिग्रहणाला शेतकर्‍यांनी विरोध केला आहे.
 
 
यापूर्वी शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेऊन जमीन अधिग्रहणाचे आदेश रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता शिष्टमंडळाने उपराष्ट्रपतींना सांगितले की, गडचिरोली जिल्हा हा पेसा क्षेत्रात येत असून पेसा कायद्यानुसार ग्रामसभांना विशेष अधिकार प्राप्त आहेत. मात्र ग्रामसभांचा स्पष्ट विरोध असतानाही शेतकर्‍यांच्या जमिनी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने हा पेसा कायद्याचा भंग आहे. या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून शेतकर्‍यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली.
 
 
यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, खासदार वर्षा गायकवाड, खासदार श्यामकुमार बर्वे, खासदार प्रशांत पडोळे, खासदार गोवाल पाडवी, खासदार सलंग ए सदमा यांच्यासह महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शिष्टमंडळात मनोहर पोरेटी, ड. दुष्यंत किरसान आदी शेतकरी उपस्थित होते.