राज्यातील पाच प्रादेशिक मानसिक रुग्णालयांचा कायापालट होणार

औषधे व उपकरणांसाठी ३० लाखांहून अधिक निधी मंजूर

    दिनांक :04-Aug-2026
Total Views |
मुंबई,
five regional mental hospitals महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील प्रमुख प्रादेशिक मानसिक रुग्णालयांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचा पाऊल उचलले आहे. पुणे, ठाणे, नागपूर, रत्नागिरी आणि बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील मानसिक व नशामुक्त संशोधन केंद्र या पाच संस्थांमध्ये स्थानिक स्तरावर आवश्यक सोयीसुविधा आणि साहित्यांच्या खरेदीसाठी एकूण ३० लाख ८१ हजार ९०० रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
 
five regional mental hospitals
 
या निधीचा वापर संबंधित रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असणारी औषधे, वस्त्र, कपडे, शस्त्रक्रियागृहासाठीचे साहित्य, किरकोळ यंत्रसामग्री आणि त्यांच्या सुट्या भागांच्या खरेदीसाठी केला जाणार आहे. राज्यातील मानसिक आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि रुग्णस्नेही करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
खरेदी प्रक्रिया पार पाडताना पारदर्शकता आणि गुणवत्तेची काळजी घेण्यासाठी शासनाने काही कडक अटी लागू केल्या आहेत. या अंतर्गत, औषधे आणि साहित्याची खरेदी राज्य औषध भांडार आणि अत्यावश्यक औषध सूचीनुसारच करणे अनिवार्य राहील. खरेदी करण्यात येणारी यंत्रसामग्री अद्ययावत आणि दर्जेदार असल्याची खात्री करण्याची जबाबदारी तांत्रिक विभागावर सोपवण्यात आली आहे. तांत्रिक तपशील तयार करताना तो विशिष्ट कंपनीला फायदा पोहोचवणारा नसावा, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.