मुंबई,
mrunal thakur कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वाढता गैरवापर आणि त्यातून तयार होणाऱ्या डीपफेक व्हिडिओंमुळे निर्माण झालेल्या धोक्याविरोधात अभिनेत्री मृणाल ठाकूर यांनी कठोर भूमिका घेतली आहे. आपल्या चेहऱ्याचा किंवा ओळखीचा वापर करून डीपफेक सामग्री तयार करणे अथवा ती सोशल मीडियावर प्रसारित करणे बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करत त्यांनी संबंधितांना थेट कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
मंगळवारी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत मृणाल यांनी आपल्या नावाचा किंवा प्रतिमेचा कोणत्याही प्रकारे गैरवापर सहन केला जाणार नसल्याचे सांगितले. "माझा चेहरा वापरून डीपफेक सामग्री तयार करणे किंवा ती शेअर करणे पूर्णपणे बेकायदेशीर आणि अस्वीकार्य आहे. ही कृती तात्काळ थांबवावी, अन्यथा माझ्या ओळखीचा पुढे कोणताही गैरवापर झाल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल," असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
एआयच्या मदतीने बनावट व्हिडिओ, छेडछाड केलेली दृश्ये आणि व्यक्तिमत्त्वाचा गैरवापर होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने अनेक कलाकारांनी याविरोधात आवाज उठवला आहे. आपल्या प्रतिमा आणि व्यक्तिमत्त्वाचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी अनेकांनी न्यायालयाचाही दरवाजा ठोठावला आहे.
मृणाल ठाकूर यांच्याप्रमाणेच अक्षय कुमार, वरुण धवन, अनिल कपूर, शिल्पा शेट्टी, प्रीती झिंटा, कार्तिक आर्यन आणि सुनील शेट्टी यांसह अनेक कलाकारांनीही एआयच्या गैरवापराविरोधात कायदेशीर संरक्षणाची मागणी केली असून, डीपफेकच्या वाढत्या प्रकारांवर कठोर कारवाईची गरज व्यक्त केली आहे.