भारत विरुद्ध बांगलादेश; शेख हसीनांवरून नवा वाद!

    दिनांक :04-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
sheikh-hasina : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसिना भारतामध्ये घेत असलेल्या पत्रकार परिषदेवर आणि राजकीय उपक्रमांवर बांगलादेशच्या नव्या सरकारने तीव्र आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात बांगलादेशच्या परराष्ट्र सल्लागारांनी ढाका येथील भारताच्या उच्चायुक्तांची भेट घेऊन आपली चिंता व्यक्त केली.
 
 
 
hasina
 
 
बांगलादेश सरकारचे असे म्हणणे आहे की, भारताच्या भूमीवरून शेख हसिना यांनी अशा प्रकारची राजकीय विधाने किंवा कार्यक्रम केल्यास त्याचा दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंधांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. बांगलादेशात अस्थिरता निर्माण होईल असे कोणतेही कृत्य भारतीय भूमीवरून होऊ नये, अशी अपेक्षा बांगलादेशने व्यक्त केली आहे.
 
यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आणि उच्चायुक्तांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारताने बांगलादेशला आश्वासन दिले आहे की या विषयाचा योग्य तो विचार केला जाईल आणि आवश्यक ती चौकशी केली जाईल. तसेच, भारताची भूमी ही कधीही इतर कोणत्याही देशाच्या किंवा बांगलादेशच्या जनतेच्या हिताच्या विरोधात वापरू दिली जात नाही, या धोरणाचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. भारत नेहमीच बांगलादेशच्या जनतेच्या विकासासाठी आणि सकारात्मक सहकार्यासाठी कटिबद्ध असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.