nagara heritage museum बहुजन बांधवांची काशी तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे देशभरातून येणार्या सर्व जाती धर्माच्या सामान्य भाविक भक्तांची भावना लक्षात घेऊन नगारा विरासत म्युझियम संग्रहालय पाहण्यासाठी १०० रुपये तिकीट दर निश्चित करावे, या मागणीसाठी मंगळवार, ४ ऑगस्ट रोजी धर्मगुरु जितेंद्र महाराज आणि धर्मगुरु कबिरदास महाराज यांच्या नेतृत्वाखाली शेकडो भाविकांच्या उपस्थितीत नगारा विरासत भवन तिकीट घराला कुलूप लावून शासन व प्रशासनाचा निषेध नोंदविला.
तीर्थक्षेत्र काशी पोहरादेवी संत नगरीत येणारा भाविक भक्त हा गरीब शेतमजूर असल्याने नंगारा विरासत संग्रहालय पाहण्यासाठी २०० रुपये तिकीट हे न परवडणारे आहे. त्यामुळे २०० रुपये तिकिटावरून १०० रुपये करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा सहनियंत्रण समितीचे अधिकारी यांच्याकडे वारंवार पत्र व्यवहाराने पाठपुरावा करूनही भाविकांची थट्टा केली जात आहे. याआधी तिकीट दर १०० रुपये व्हावा यासाठी २५ जुलै २०२६ रोजी नगारा विरासत संग्रहालयाला शेकडो भाविकांच्या उपस्थितीमध्ये ताला ठोकण्याच्या इशार्याचे आंदोलन धर्मगुरू जितेंद्र महाराज आणि धर्मगुरू कबीरदास महाराज यांनी दिले होते. परंतु गुरुपौर्णिमा निमित्त ३ दिवस तिकीट दर १०० रुपये करण्याचा आदेश सबंधित अल्फा कंपनीला जिल्हाधिकार्यांनी देऊन ३० जुलै २०२६ रोजी यासंदर्भात निर्णय घेण्याचा ठरविले होते. परंतु प्रत्यक्षात कुठलाही निर्णय न झाल्याने पुन्हा ताला ठोको आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला होता. त्याअनुषंगाने ४ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता आंदोलन करण्यात आले. आंदोलन स्थळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.