माहूरच्या तांबूलला जीआय मानांंकन

    दिनांक :04-Aug-2026
Total Views |
वेध...
चंद्रकांत लोहाणा
mahurs tambul महाराष्ट्र राज्याला अनेक सांस्कृतिक, धार्मिक आणि संत परंपरांचा वारसा लाभला आहे. या वारशामध्ये आणखी एक ऐतिहासिक भर पडली आहे. राष्ट्रीय स्तरावर मिळालेली ही नवी ओळख धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी प्रमुख पीठ असलेल्या तीर्थक्षेत्र माहूर गडावरील श्री रेणुकामाता मंदिरामध्ये देवीला नैवेद्य म्हणून अर्पण केल्या जाणाऱ्या पारंपरिक तांबूलला केंद्र सरकारने अधिकृत भौगोलिक मानांकन बहाल केले आहे. त्यामुळे माहूरचा तांबूल प्रसाद हा देशामध्ये तिरुपती देवस्थानमध्ये मिळणाऱ्या लाडूच्या प्रसादानंतर जीआय मानांकन मिळविणारा दुसरा तर महाराष्ट्रामध्ये पहिला मानांकनप्राप्त प्रसाद ठरला आहे. या यशामुळे माहूरच्या धार्मिक पर्यटनाला जागतिक स्तरावर फार मोठी गती मिळणार आहे. माहूरचा हा प्रसाद फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे.
 
 
mahurs tambul
 
 
हा प्रसाद लाखो भक्तांच्या आस्थेचाही विषय आहे. त्यावर केंद्र सरकारने शिक्कामोर्तबही केले आहे. या तांबूल प्रसादाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये वापरण्यात येणारे सर्व घटक नैसर्गिक आणि आयुर्वेदिकदृष्ट्या औषधीयुक्त आहेत. या तांबूलमध्ये विड्याची पाने, सुपारी, चुना, काथ, लवंग, सोप, वेलची, जायपत्री, जायफळ, धनेडाळ, ओवा, जेष्ठमध, आस्मन तारा या घटकांचा समावेश आहे. पारंपरिक पद्धतीने हे सर्व घटक एकत्र करून दगडी खलबत्त्यामध्ये तांबूल तयार करण्यात येतो. प्राचीन धर्मग्रंथ आणि लोक परंपरेच्या मान्यतेनुसार श्री रेणुका मातेने त्यांचे परम् भक्त असलेल्या श्री विष्णुकवी महाराजांना स्वप्नामध्ये दृष्टांत देऊन तांबुलाचा नवैद्य सुरू करण्याची आज्ञा दिली होती. त्यानंतर ही पवित्र परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे.
 
पारंपरिक सेवेकरी कुटुंब कोणत्याही व्यावसायिक फायद्याविना हा वारसा जपण्याचे कार्य करीत आहेत. पूर्वी जवळपास प्रत्येक घरामध्ये जेवणानंतर विड्याचे पान खाण्याची एक समृद्ध भारतीय परंपरा चालत आली होती. अशा कितीतरी समृद्ध परंपरांना आम्ही विसरत चाललो आहोत. या परंपरा तथ्यहीन नाहीत. त्यामध्ये निरोगी जगण्याची कला आणि विज्ञान दडले आहे. आयुर्वेदामध्ये विड्याच्या पानास अमृतासमान मानले गेले आहे. विड्याच्या पानाचे नियमित सेवन केल्यास शरीरामध्ये होणाऱ्या शेकडो रोगांपासून मुक्ती मिळू शकते. त्यामुळे एक शौक म्हणून नव्हेे तर मानवी शरीराची एक आवश्यक बाब आणि औषध म्हणून ही परंपरा आमच्या पूर्वजांनी समाजामध्ये रुजविली. ही परंपरा त्यांनी यथाशक्ती जोपासलीही. प्राचीन आयुर्वेद ग्रंथामध्ये सर्व रोगांची वात, पित्त आणि कफ या तीन दोषांमध्ये विभागणी केली आहे. तीन दोषांपैकी शरीरामध्ये एक जरी दोष असंतुलित झाला तर शारीरिक व्याधी उत्पन्न होतात. मानवी शरीरामधील वात आणि कफ असंतुलित झाल्यावर होणाऱ्या आजारांवर विड्याचे पान अतिशय उपयुक्त असल्याचे म्हटले आहे. जेवणानंतर विड्याचे पान खाल्ल्याने मुखामधील अनेक जीवाणूंंचा प्रभावीपणे सामना केला जातो. त्यामुळे मुखातील दुर्गंधी नाहीशी होते. दात दुखणे, दात किडणे यावरही विड्याचे पान अतिशय गुणकारी आहे. जेवणानंतर फक्त विड्याचे पान चावून खाल्ल्याने पचनसंस्था सुधारून अपचनाचा त्रास कमी होतो व पोटामध्ये वाढलेला वात (वायू) कमी होण्यास मदत होते. विड्याच्या पानास आयुर्वेदामध्ये उष्ण मानले गेले आहे.mahurs tambul त्यामुळे हे पान वात आणि कफ या दोन्ही दोषावर अतिशय उपयुक्त मानले गेले आहे. घशामध्ये कफ साठणे, सर्दी पडसे व आदी कफाच्या अनेक विकारांसाठी पानाचा उपयोग केला जाऊ शकतो. विड्याचे पान उष्ण असल्याने पित्त प्रकृतीच्या लोकांनी जपून वापर करावा, असे आयुर्वेद ग्रंथ सांगतो.
औषधी गुणांनी परिपूर्ण असलेले विड्याचे पान म्हणजे भारतीयांचा एक समृद्ध वारसा आहे. काळाच्या ओघामध्ये आम्ही आधुनिक होत गेल्याने हाही एक समृद्ध वारसा मागे पडला आहे. भारतीय समाजाने आधुनिकतेची कास धरल्याने आम्हीच आमच्या चिरंतन परंपरांना वाळीत टाकले आहे. परंतु, काळानुरूप त्याचे विश्लेषण केल्यास त्यामागे आमच्या पूर्वजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन सहज लक्षात येईल. जगामध्ये कोठेच नसेल असा भारतीयांचा आहारही एक समृद्ध आणि परिपूर्ण आहार गणला जातो. त्यामुळे या परंपरांना उजाळा देऊन त्याचे जतन केल्यास आमच्या निरोगी आरोग्याचा मार्ग अधिक सुकर होऊ शकतो.
९८८१७१७८५६