सायबर फसवणूक रॅकेटच्या ‘मास्टरमाइंड’ला अटक

- उत्तरप्रदेश पोलिसांची नागपुरात मोठी कारवाई;

    दिनांक :04-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर, 
cyber-fraud : बनावट आयपीओ आणि शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या नावाखाली देशभरातील नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय सायबर टोळीच्या ‘मास्टरमाइंड’ला उत्तर प्रदेश पोलिसांनी (यूपी एसटीएफ)ने नागपुरातून अटक केली. अनुराग अरविंद श्रीवास्तव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
 
 
JKL
 
 
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊ येथील सायबर पोलिस ठाण्यात आरोपी अनुराग श्रीवास्तवविरुद्ध मोठ्या आर्थिक सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. अटकेनंतर उत्तरप्रदेश पोलिसांनी त्याला ट्रान्झिट रिमांडवर लखनऊ येथे नेले. तेथे न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. मानकापूरचे ठाणेदार हरीश कालसेकर यांनीही यूपी एसटीएफने आरोपीला अटक करून नेल्याची माहिती दिली.
 
 
आरोपी सोशल मीडिया, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून नागरिकांना शेअर बाजार आणि आयपीओमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत होता. इच्छुकांना प्रथम एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडले जात असे. तेथे बनावट ट्रेडिंग सल्ले, खोटे नफ्याचे स्क्रीनशॉट आणि दिशाभूल करणारी माहिती दाखवून विश्वास संपादन केला जात होता. त्यानंतर गुंतवणूकदारांना ‘सेंच्युरी ॲप’ नावाचे बनावट गुंतवणूक ॲप डाउनलोड करण्यास सांगून विविध बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास भाग पाडले जात होते. ॲपमध्ये गुंतवणूक आणि नफा वाढत असल्याचे दाखवले जात असले, तरी प्रत्यक्षात संपूर्ण यंत्रणा फसवी असल्याचे तपासात समोर आले आहे. यूपी पोलिसांनी छाप्यात आरोपीकडून एक लॅपटॉप, एक आयफोन, दोन सिमकार्ड, तीन कंपन्यांचे शिक्के, सहा कोऱ्या चेकबुक, ३.१७ कोटी रुपयांची रोकड, २.५० कोटी रुपयांचे दोन स्वाक्षरी नसलेले धनादेश, एक रद्द केलेला धनादेश, १३९ पानांची कागदपत्रे आणि एक टाटा नेक्सॉन कार जप्त करण्यात आली.
चौकशीत आरोपीने २०२२ मध्ये साथीदारांसह बनावट गेमिंग आणि फॅन्टसी गेमिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही कोट्यवधी रुपयांचे व्यवहार करून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याची कबुली दिल्याची माहिती आहे. आरोपीविरुद्ध विविध ठिकाणी एकूण ११ गुन्हे दाखल असून, या टोळीचा संबंध राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल पोर्टलवर नोंद असलेल्या तब्बल ३०८७ तक्रारींशी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तपास यंत्रणांनी आतापर्यंत सुमारे दोन कोटी रुपयांच्या व्यवहाराशी संबंधित बँक खाती गोठवली असून, या रॅकेटमधील इतर आरोपींचा शोध सुरू आहे.