नवी दिल्ली,
neet ug नीट-यूजीच्या सहा उमेदवारांनी ‘ओएमआर शीट’च्या विसंगतीवरुन मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे़ परीक्षेदरम्यान त्यांच्या ओएमआर शीटवर नोंदवलेली उत्तरे आणि राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) दिलेल्या ओएमआर शीटच्या प्रतींमध्ये तफावत असल्याचा आरोप केला आहे. समुपदेशन प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी लवकर सुनावणी व्हावी, अशी मागणी करणारी याचिका सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्यासमोर सादर करण्यात आली आहे.
वकिलाने सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहन यांच्या न्यायासनाला सांगितले की, हे प्रकरण ६०० आणि ६५० पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या सहा विद्यार्थ्यांशी संबंधित आहे. त्यांचा दावा आहे की, एनटीएने अपलोड केलेल्या ओएमआर शीटवर नोंदवलेली उत्तरे आणि त्यांनी परीक्षेदरम्यान चिन्हांकित केलेली उत्तरे भिन्न आहेत.
वकिलांनी न्यायालयाला असेही सांगितले की, विद्यार्थ्यांनी या संदर्भात एनटीएला ईमेल पाठवले होते़ त्यांच्या कार्यालयालाही भेट दिली होती़ परंतु त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर, न्यायासनाने हे प्रकरण सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्यास सहमती दर्शवली. नीट यूजी २०२६ परीक्षा मूळतः ३ मे रोजी नियोजित होती़ परंतु पेपरफुटीमुळे ती रद्द करण्यात आली. त्यानंतर एनटीएने २१ जूनला परीक्षा पुन्हा आयोजित केली.
‘ओएमआर शीट’चा वाद काय आहे?
नीट यूजी २०२६ परीक्षेनंतर काही उमेदवारांनी असा आरोप केला आहे की त्यांनी त्यांच्या उत्तरपत्रिकांवर (ओएमआर शीट) लिहिलेली उत्तरे एनटीएने दिलेल्या स्कॅन केलेल्या प्रतींशी जुळत नाहीत. त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे बदलली गेली आहेत किंवा चुकीची लिहिलेली दिसत आहेत़ त्यामुळे त्यांच्या गुणांवर आणि रँकिंगवर परिणाम झाला, असा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे.