बीएचएमएस डॉटरांना नोंदणी देण्याच्या प्रस्तावाला विरोध

आयएमएचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

    दिनांक :04-Aug-2026
Total Views |
वर्धा,
bhms doctors महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये सीसीएमपी (सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी) पूर्ण केलेल्या बीएचएमएस डॉटरांना नोंदणी देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. या प्रस्तावास इंडियन मेडिकल असोसिएशनने विरोध केला असून सदर नोंदणी प्रस्ताव तात्काळ मागे घेण्यात यावा, यासह अन्य मागण्यांसाठी आयएमएच्या वतीने आज मंगळवार ४ रोजी जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
 
 
bhms doctors
 
आधुनिक वैद्यकशास्त्र (मॉडर्न मेडिसीन/अ‍ॅलोपॅथी) ही पुराव्यावर आधारित, वैज्ञानिक व अत्यंत सखोल शिक्षण तसेच प्रशिक्षणाची शाखा आहे. एमबीबीएस पदवीसह आवश्यक इंटर्नशिप, रुग्णालयीन प्रशिक्षण व त्यानंतरचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतरच आधुनिक वैद्यकाचा स्वतंत्रपणे सराव करण्याची पात्रता प्राप्त होते. अशा परिस्थितीत अल्पकालीन सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या बीएचएमएस डॉटरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी देणे हे वैद्यकीय शिक्षणाच्या मानकांना बाधा आणणारे असून रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी तसेच सार्वजनिक आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.
 
 
या संदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य, एमएआरडी, एएसएमआय तसेच विविध विशेषज्ञ वैद्यकीय संघटनांनी शासनाकडे अनेकवेळा निवेदने, पत्रव्यवहार व चर्चेद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र, या गंभीर विषयाकडे अद्याप गांभीर्याने लक्ष देण्यात आलेले नाही. या पृष्ठभूमीवपर रुग्णहित, सार्वजनिक आरोग्य आणि आधुनिक वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता अबाधित राखण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली. त्या अनुषंगाने आयएमए वर्धा शाखेच्या सर्व सदस्यांनी या आंदोलनात सहभागी झाले.
 
 
सीसीएमपी पूर्ण केलेल्या बीएचएमएस डॉटरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी देण्याचा कोणताही प्रस्ताव तात्काळ मागे घ्यावा, रुग्णांची सुरक्षितता आणि सार्वजनिक आरोग्य लक्षात घेऊन आधुनिक वैद्यकाचा सराव केवळ कायदेशीररित्या पात्र व नोंदणीकृत आधुनिक वैद्यकीय पदवीधारकांनाच करण्याची परवानगी द्यावी, आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आयएमएचे वर्धा शाखा अध्यक्ष डॉ. प्रदीप सुने, सचिव डॉ. विवेक चाकोले यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले.
 
 
पुलगावातही निवेदन
आयएमए पुलगाव शाखेतील सर्व डॉटरांनी राज्यस्तरीय आयएमएने पुकारलेल्या एकदिवसीय वैद्यकीय सेवा बंदला पाठिंबा देत आपली सेवा बंद ठेवली. या संदर्भात अप्पर तहसीलदार स्नेहा क्षीरसागर यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी डॉ. डहाके, डॉ. नितनवरे, डॉ. पीयूष शाह, डॉ. प्रवीणा शाह, डॉ. बोहरा, डॉ. काळे, डॉ. नंदुरकर उपस्थित होते.