नवी दिल्ली,
ramayan look costume controversy दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुचर्चित आणि तब्बल ४००० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये साकारल्या जात असलेल्या 'रामायण' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आले आहे. चित्रपटातील भव्य दृश्यरचना, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि कलाकारांच्या भूमिकांचे अनेकांनी कौतुक केले असले, तरी सीता आणि कैकेयी यांच्या वेशभूषेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या टीकेनंतर चित्रपटाच्या वेशभूषाकार रिम्पल आणि हरप्रीत नरुला यांनी आपली भूमिका स्पष्ट करत ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे.
ट्रेलरमध्ये साई पल्लवीने साकारलेल्या सीतेच्या वेशभूषेतील ब्लाउज आणि लारा दत्ताने साकारलेल्या कैकेयीच्या साडी व तिच्या काठावरील डिझाइनबाबत अनेकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. काहींनी या लूकची तुलना दूरचित्रवाणीवरील पौराणिक मालिकांशी करत चित्रपटाच्या सादरीकरणावर प्रश्न उपस्थित केले.
या पार्श्वभूमीवर एका मुलाखतीत बोलताना रिम्पल यांनी सांगितले की, 'रामायण' हे भारतीयांच्या श्रद्धेशी आणि भावविश्वाशी जोडलेले महाकाव्य असल्यामुळे चित्रपटातील प्रत्येक गोष्टीवर चर्चा होणार, याची त्यांना आधीपासूनच कल्पना होती. कलाकारांची निवड, वेशभूषा आणि दृश्यरचनेवर मतभेद होणे स्वाभाविक असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, इतक्या तीव्र नकारात्मक प्रतिक्रिया येतील, याची अपेक्षा नव्हती, असेही त्यांनी नमूद केले.
सीतेच्या वेशभूषेबाबत सुरू झालेल्या वादावर बोलताना रिम्पल म्हणाल्या की, त्यांनी लहानपणापासून मनात जपलेल्या देवी सीतेच्या प्रतिमेवर आधारित हा लूक तयार केला आहे. "मी जेव्हा डोळे मिटून देवी सीतेचा विचार करते, तेव्हा ती मला याच स्वरूपात दिसते. माझ्या श्रद्धेतील आणि मनातील देवीची प्रतिमा पडद्यावर साकारण्याचा हा जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय होता," असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कैकेयीच्या वेशभूषेबाबत हरप्रीत नरुला यांनीही आपली भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, कैकेयीच्या पोशाखातील प्रत्येक रंग आणि प्रत्येक डिझाइन तिच्या मानसिक आणि भावनिक प्रवासाशी जोडलेले आहे. हिरवा रंग तिच्या मातृत्वाचे प्रतीक आहे, तर गडद मरून रंग तिच्या अंतर्गत संघर्षाचे आणि कठोर निर्णयांचे प्रतिनिधित्व करतो. भरत आणि राम यांच्यातील भावनिक द्वंद्व तिच्या व्यक्तिमत्त्वातून दिसावे, यासाठी वेशभूषेची संकल्पना काळजीपूर्वक तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
हरप्रीत यांनी पुढे सांगितले की, प्राचीन महाकाव्य आधुनिक पिढीसमोर नव्या दृश्यभाषेत सादर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या वेशभूषेतील प्रत्येक धाग्यामागे विचार आणि संशोधन दडलेले असून, केवळ ट्रेलर पाहून निष्कर्ष काढण्याऐवजी संपूर्ण चित्रपट पाहिल्यानंतरच मत व्यक्त करावे, असे आवाहन त्यांनी प्रेक्षकांना केले.
नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू रामाच्या, साई पल्लवी सीतेच्या, सनी देओल हनुमानाच्या, रवी दुबे लक्ष्मणाच्या, तर यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. नमित मल्होत्रा निर्मित हा महत्त्वाकांक्षी चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार असून, पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये तर दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.