रश्मिकाची सलग तिसरी दुखापत

    दिनांक :04-Aug-2026
Total Views |
मुंबई,
rashmikas third consecutive injury अभिनेत्री रश्मिका मंदाना हिला तिच्या आगामी ‘मैसा’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दुखापत झाल्याची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. अखेर रश्मिकाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत स्वतःच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. यावेळी तिने ही सलग तिसरी दुखापत असल्याचे सांगत, सुरुवातीला ही बाब कोणालाही समजू नये अशी इच्छा होती, असेही स्पष्ट केले.
 
rashmikas third consecutive injury
 
इन्स्टाग्रामवर फोटो आणि सविस्तर पोस्ट शेअर करत रश्मिकाने लिहिले की, "दुखापत होणं खूप वाईट असतं आणि ही गोष्ट कोणालाही कळू नये, अशी माझी इच्छा होती. मात्र आता मी पुन्हा तुमच्यासमोर आले आहे. ही माझी सलग तिसरी दुखापत आहे. आता मला माझ्या शरीराशी मशीनप्रमाणे नव्हे, तर मानवी शरीराप्रमाणे वागायला शिकायला हवे."
 
तिने आपल्या दुखापतीविषयीही सविस्तर माहिती दिली. तिच्या म्हणण्यानुसार, उजव्या नितंबातील चार कंडरांपैकी एक कंडरा तुटली असून त्यामुळे पाय उचलणे आणि हालचाल करणे कठीण झाले आहे. ही कंडरा पुन्हा जोडावी लागणार असल्याचेही तिने सांगितले. ‘मैसा’ चित्रपटातील एका डान्स सीक्वेन्सच्या शूटिंगदरम्यान हा अपघात झाला. हा तिच्या कारकिर्दीतील सर्वात आव्हानात्मक नृत्यप्रसंग असल्याचेही तिने नमूद केले.
 
दुखापतीमुळे काही काळ सक्तीची विश्रांती घ्यावी लागत असल्याचे सांगताना रश्मिका म्हणाली की, वेदना होत असल्या तरी त्या असह्य नाहीत. कदाचित सतत काम करत असल्यामुळे देवानेच आता विश्रांती घ्यायला भाग पाडले असावे, असे ती विनोदी शैलीत म्हणाली. या काळात ती विविध कोडी सोडवत वेळ घालवत असून, त्यात आपण चांगले असल्याचे आता कळल्याचेही तिने चाहत्यांसोबत शेअर केले.