नागपूर,
india book of records एकाच व्यासपीठावर ११२ गायकांनी सुरेल स्वरांची उधळण करीत सलग १२१ युगूलगीते गाण्याचा विक्रम नागपुरात नोंदवला गेला. या आयोजनातून मो. रफी यांना श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली. डॉ. दंदे फाउंडेशन आणि श्री संती गणेशोत्सव सांस्कृतिक मंडळाने मो. रफी सांस्कृतिक मंच यांच्या सहकार्याने 'गाये चला जा' या विशेष संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सलग १२१ युगूल गीेते प्रस्तुत करुन 'ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्डस - २०२६' मध्ये या सांस्कृतिक आयोजनाची नोंद करण्यात आली.
ज्येष्ठ गायक सुनीलकुमार वाघमारे यांच्या संकल्पनेतून या सांगितिक प्रस्तुतीची योजना करण्यात आली. या विक्रमी आयोजनात नागपुरातील १२ व्यावसायिक आणि १०० हौशी गायक कलावंतांनी मिळून १२१ गाणी प्रस्तुत केली. सुमारे १२ तास हे युगूलगीत गायन अमृत भवनम् सभागृहात सुरु होते. मौदा येथील निवासी अपूर्वा हिरडे या गुणी गायिकेने विविध गायकांबरोबर ५० युगूल गीते प्रस्तुत करीत एक आगळावेगळा विक्रम नोंदवला.
या आयोजनाचे उद्घाटन श्रीमंत मुधोजीराजे भोसले, साहित्यिक डॉ. सागर खादीवाला, स्वामिनारायण ट्रस्टचे प्रकाश कोठारी, सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश गुप्ता, नरेंद्र सतीजा, भरत ठक्कर, मनोज ठक्कर, नगरसेवक श्रीकांत आगलावे, आयपीएस विनिता साहू, संजय चिंचोले, मराठी अभिनेते देवेंद्र दोडके मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्डस्-चे संसेथापक संचालक इंद्रजित मोरे यावेळी आवर्जुन उपस्थित होते. या विक्रमी युगूलगीत कार्यक्रमात सर्व सहभागी गायकांचा पदक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.