जिर्ण वर्गखोल्यातून विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जन!

- जि.प. शाळांच्या 636 वर्गखोल्यांची दुरुस्ती रखडली ः निधीच्या मंजूरीची प्रतीक्षा

    दिनांक :04-Aug-2026
Total Views |
गोंदिया, 
zilla-parishad-school : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पायाभूत सुविधांचा नेहमीच चर्चेत राहत असताना जिल्ह्यातील 636 वर्गखोल्या जीर्ण अवस्थेत असल्याचे शिक्षण विभागाच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. या वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी सुमारे 5 कोटी 25 लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता असून त्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. मात्र, अद्याप निधी मंजूर न झाल्याने दुरुस्तीची कामे रखडली आहेत. त्यामुळे जिर्ण वर्गखोल्यांमधूनच विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जन सुरु असल्याचे वास्तव पुढे आले आहे.
 

zilla-parishad-school 
 
 
 
गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 1 हजार 33 प्राथमिक शाळा कार्यरत आहेत. यापैकी अनेक शाळांच्या इमारती आणि वर्गखोल्या जीर्ण झाल्या असून काही ठिकाणी विद्यार्थ्यांना धोकादायक इमारतींमध्येच शिक्षण घ्यावे लागत आहे. शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील 636 वर्गखोल्या दुरुस्तीयोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी सुमारे 5 कोटी 25 लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता असून त्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. मात्र, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही निधी मंजूर न झाल्याने दुरुस्तीची कामे सुरू होऊ शकलेली नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांना जीर्ण इमारतींमध्येच शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर निधीअभावी ही कामे प्रलंबित असून संबंधित प्रस्ताव शासनस्तरावर मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापनासह पालकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.
 
 
सर्वेक्षणानुसार 636 वर्गखोल्या जिर्ण आढळून आल्या असून विद्यार्थ्यांना दुसर्‍या वर्गखोल्यांमध्ये बसण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर सदर जिर्ण वर्गखोल्या पाडण्याबाबत संबंधित ग्राम पंचायतींना पत्र देण्यात आले आहे.
- जी. झेड. बघेले, अभियंता, समग्र शिक्षा अभियान, जि.प. गोंदिया
 
 
जीर्ण वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे करण्यात आली आहे. या मागणीबाबत पालकमंत्री सकारात्मक असून लवकरच निधी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे.
- सुरेश हर्षे, उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती, जि. प. गोंदिया