तभा वृत्तसेवा
मुंबई,
dr mohanji bhagwat देशातील नवी पिढी आज लोकशाही, नेतृत्व आणि राष्ट्रउभारणीच्या मंथनात सक्रिय सहभाग नोंदवत आहे. याच पृष्ठभूमीवर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत गुरुवार, ६ ऑगस्ट रोजी मुंबईत ‘जेन-झी’सोबत थेट संवाद साधणार आहेत. वांद्रे-कुर्ला संकुल येथील नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
‘भारताची आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र चळवळ’ (आयआयएमयूएन) या संस्थेच्या १५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून या भव्य वार्षिक अजिंक्यपद परिषदेच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय परिषदेमध्ये देशभरातील १०० हून अधिक शहरांमधील १५ ते १९ वयोगटाचे सुमारे २ हजारपेक्षा जास्त उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ही परिषद जगातील सर्वांत मोठ्या युवा-नेतृत्वाखालील संमेलनांपैकी एक मानली जाते.
२०११ मध्ये ऋषभ शाह यांनी स्थापन केलेली ही संस्था ‘भारत’ या संकल्पनेचा जागतिक पातळीवर प्रसार करणारे प्रमुख व्यासपीठ आहे. गेल्या १५ वर्षांपासून १५ ते २४ वयोगटातील तरुणच ही संस्था पूर्णपणे चालवत आहेत. या व्यासपीठावरून घडलेले अनेक तरुण पुढे जाऊन लोकप्रतिनिधी, सनदी अधिकारी, पोलिस अधिकारी, वकील, लेखक आणि उद्योगपती बनले आहेत. या संस्थेच्या सल्लागार मंडळात उद्योग, न्यायव्यवस्था आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश आहे. यामध्ये उद्योगपती अजय पिरामल, दीपक पारेख, नादिर गोदरेज, खासदार डॉ. शशी थरूर, माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, चित्रपट दिग्दर्शक करण जोहर, माजी लष्करप्रमुख, ऑलिम्पिकपटू खा. पी. टी. उषा यांसारख्या नामांकित व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे.