'हवेतच जीव टांगणीला...' विमानातील थराराचा VIDEO चर्चेत! 12 प्रवासी जखमी

एअर इंडियाच्या विमानात भीषण टर्ब्युलन्स

    दिनांक :04-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
thailand-delhi-air-india-flight : थायलंडमधील फुकेत येथून भारताची राजधानी दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात आकाशात अचानक भयानक वातावरणीय गोंधळ निर्माण झाल्याने मोठा थरार पाहायला मिळाला. प्रवासादरम्यान विमान अचानक अतिशय तीव्र झटक्यांचा (टर्ब्युलन्स) शिकार झाले. हे झटके इतके भीषण होते की, विमान आपल्या निश्चित उंचीवरून अचानक तब्बल ३०० फूट खाली आले. या अचानक झालेल्या बदलामुळे आणि विमानाला बसलेल्या जोरदार धक्कादायक हालचालींमुळे १२ प्रवासी जखमी झाले असून काहींच्या कानाला तर काहींच्या मानेला दुखापत झाली आहे.
 
 

AIR INDIA 
 
 
दिल्लीत विमान उतरण्याच्या काही वेळ आधीच आकाशात अचानक हा प्रकार घडला. विमान अत्यंत वेगाने खाली येऊ लागल्याने आणि हिचकोळे खाऊ लागल्याने विमानात प्रवाशांची प्रचंड आरडाओरड आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही वेळासाठी विमानात संपूर्ण अफरातफरी माजली होती. मात्र, अशा अत्यंत कठीण परिस्थितीतही वैमानिकाने कमालीचे प्रसंगावधान राखून विमानावर ताबा मिळवला आणि दिल्ली विमानतळावर विमानाचे सुरक्षित उतरण (लँडिंग) घडवून आणले.
 
 

AIR INDIA 
 
एअर इंडियाने जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, ४ ऑगस्ट रोजी फुकेतवरून दिल्लीला येणाऱ्या एआय२३७९ या उड्डाणाला हवेत काही काळासाठी तीव्र हवामानाचा सामना करावा लागला होता. यामुळे विमानाची उंची अचानक काही प्रमाणात बदलली. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. ज्या काही प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली होती, त्यांना तातडीने विमानतळावरील आरोग्य केंद्रात नेऊन वैद्यकीय तपासणी आणि प्रथमोपचार पुरवण्यात आले. प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता हीच आपली सर्वोच्च प्राथमिकता असून, प्रभावित प्रवाशांना सर्व प्रकारची मदत पुरवली जात आहे आणि या घटनेच्या तपासात संबंधित यंत्रणांना पूर्ण सहकार्य केले जात असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.
 
 
 
 
 
 
दरम्यान, आकाशात हवेचा प्रवाह असमान आणि अनियमित होतो, तेव्हा अशा प्रकारचा हवेतील गोंधळ निर्माण होतो. सहसा हवा शांत आणि स्थिर थरांमध्ये वाहते, परंतु जमिनीच्या उष्णतेमुळे गरम हवा वर जाणे, पर्वतांना हवा धडकणे, किंवा ढग आणि वादळांमधील तीव्र प्रवामांमुळे हवेत अशा गडबडी निर्माण होतात. अशा परिस्थितीत विमानाला अचानक वर-खाली किंवा डावीकडे-उजवीकडे तीव्र झटके बसतात. आधुनिक विमाने अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी अत्यंत सुरक्षितपणे बनवलेली असतात आणि परिस्थिती गंभीर असल्यास वैमानिक विमानाची उंची बदलून शांत हवेच्या क्षेत्रात विमान घेऊन जातात.