नागपूर,
Statue of Freedom शहरातील मध्यवर्ती लोकमत चौकातील स्टॅच्यू ऑफ फ्रीडम प्रेस परिसरात अनेक दिवसांपासून साचलेल्या सांडपाण्यामुळे घाण, दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. परिसरात प्लास्टिक व कचरा साचल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
या भागात विविध रुग्णालये असल्याने उपचारासाठी बाहेरगावाहून येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची मोठी वर्दळ असते. मात्र साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा करावा, परिसराची स्वच्छता करावी, डास प्रतिबंधक फवारणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी महानगरपालिकेकडे केली आहे.
सौजन्य:अशोक माटे,संपर्क मित्र