छिंदवाडा,
tamia-hills : पावसाळा आणि पर्यटन यांचं नातं नेहमीच वेगळं आणि खास असतं. एकीकडे पावसामुळे हवेत निर्माण होणारा गारवा आणि दुसरीकडे पावसात अधिकच खुलून दिसणारा हिरवागार निसर्ग पर्यटकांना भुरळ पाडत असतो. या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी अनेक जण फिरण्याच्या नवनवीन ठिकाणांच्या शोधात असतात. मात्र, सध्या समाजमाध्यमांमुळे प्रसिद्ध पर्यटन स्थळांवर पर्यटकांची प्रचंड गर्दी दिसून येते, ज्यामुळे शांततेत निसर्गाचा आनंद घेणे कठीण होते. म्हणूनच, आजकाल पर्यटकांचा ओढा अशा ठिकाणांकडे वाढताना दिसत आहे, ज्यांबद्दल लोकांना फारशी माहिती नाही आणि जिथे गर्दी नसेल. असंच एक अप्रतिम आणि निसर्गरम्य ठिकाण म्हणजे मध्य प्रदेशातील 'तामिया हिल्स'.

मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगेत वसलेले तामिया हिल्स हे समुद्रसपाटीपासून सुमारे ३,७६५ फूट उंचीवर स्थित एक सुंदर, शांत आणि कमी गर्दी असलेले हिल स्टेशन आहे. हे ठिकाण घनदाट जंगले, खोल दऱ्या आणि वळणदार घाट रस्त्यांसाठी ओळखले जाते. तामियापासून जवळच 'पाताळकोट' नावाची एक गूढ आणि सुंदर दरी आहे, जी उंचावरून पाहिल्यास घोड्याच्या नाळेसारखी दिसते. या दरीमध्ये गोंड आणि भारिया या पारंपरिक आदिवासी जमातींचे वास्तव्य आहे. तसेच येथे ब्रिटीश काळातील एक ऐतिहासिक पॉइंट आहे, जिथून निसर्गाचे विहंगम दृश्य आणि नेत्रदीपक सूर्यास्त पाहायला मिळतो. येथे पर्यटकांची फारशी गर्दी नसून निसर्गाच्या सानिध्यात निवांत शांतता अनुभवता येते.
विशेष म्हणजे विदर्भातील नागपूर शहरापासून हे ठिकाण अवघ्या २१५ किलोमीटर म्हणजेच सुमारे ४ तासांच्या अंतरावर आहे. त्यामुळे नागपूर आणि आसपासच्या परिसरातील पर्यटकांसाठी विकेंडच्या सुट्टीत भेट देण्यासाठी हे अत्यंत सोयीचे ठिकाण ठरते. ज्यांना वळणदार रस्त्यांवरून प्रवास करण्याची आणि बाईक रायडिंगची आवड आहे, त्यांच्यासाठी हा प्रवास अतिशय आनंददायी आणि आल्हाददायक ठरू शकतो. अनुभवी पर्यटकांच्या मते, पावसाळ्यात निसर्गाचे खरे सौंदर्य अनुभवायचे असेल, तर जुलै ते सप्टेंबर हा काळ तामिया हिल्सला भेट देण्यासाठी सर्वाधिक उत्तम मानला जातो.