30 हून अधिक दहशतवादी ठार; लष्कर-ए-तोयबाच्या नेत्याची उघड कबुली! VIDEO

    दिनांक :04-Aug-2026
Total Views |
इस्लामाबाद,
terrorists-eliminated-in-pakistan : पाकिस्तानात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा अज्ञात हल्लेखोरांकडून शोध घेऊन खात्मा केला जात असल्याच्या चर्चांना आता खुद्द दहशतवादी संघटनेनेच दुजोरा दिला आहे. लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित रिझवान हनीफ नावाच्या वरिष्ठ नेत्याची एक चित्रफित समोर आली असून, त्यात त्याने गेल्या तीन ते चार वर्षांत पाकिस्तानात ३० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याची उघड कबुली दिली आहे.
 
 
PAK
 
 
समोर आलेल्या चित्रफितीत रिझवान हनीफ जमावाला संबोधित करताना दिसत आहे. पेशावर, कराची, रावळपिंडी, मुझफ्फराबाद आणि रावलकोट यांसारख्या विविध महत्त्वाच्या शहरांमध्ये आपल्या सहकाऱ्यांवर लक्ष्य करून हल्ले करण्यात आले आहेत, असे त्याने म्हटले आहे. या हल्ल्यांमागे गुप्तचरांचा हात असल्याचा दावा करत, पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या प्रदेशातही आपल्या सहकाऱ्यांना शांततेने राहू दिले जात नसल्याची हतबलता त्याने व्यक्त केली आहे.
 
 
 


सौजन्य: सोशल मीडिया
 
 
 
एका दहशतवादी संघटनेच्या वरिष्ठ नेत्याने आपल्या सहकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणातील मृत्यूबद्दल अशी उघड कबुली देण्याची ही पहिलीच वेळ मानली जात आहे. यापूर्वी पाकिस्तानात विविध दहशतवादी संघटनांच्या अनेक प्रमुख नेत्यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे.
 
दुसरीकडे, पाकिस्तानच्या भूमीवर लष्कर-ए-तोयबा ही संघटना सक्रिय नाही आणि ती नष्ट झाली आहे, असा दावा पाकिस्तान सरकार वारंवार करत आले होते. मात्र, रिझवान हनीफच्या या भाषणामुळे आणि उघड कबुलीमुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा संपूर्ण जगासमोर उघडा पडला आहे.