रात्री विद्यार्थिनींना रस्त्यावर सोडून बसचा पोबारा

    दिनांक :04-Aug-2026
Total Views |
सेलू, 
st-bus-left : प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाची हमी देणार्‍या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सेवेला चालक-वाहकांच्या मनमानीमुळे गालबोट लागल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री सेलू येथे घडली. वर्धा येथे शिकवणीसाठी आलेल्या सेलूतील दोन विद्यार्थिनींना रात्री बस न थांबविता सोडून दिले.
 
 
 
JLK
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास दोन्ही विद्यार्थिनी वर्धेेतील धुनिवाले चौक येथे सेलूला परत येण्यासाठी बसची वाट पाहत उभ्या होत्या. त्याचवेळी नेर आगाराची यवतमाळ—नागपूर ही बस आली. विद्यार्थिनी बसमध्ये चढण्यासाठी जात असतानाच वाहकाने बस सेलू बसस्थानकात थांबत नाही, असे सांगत बस पुढे नेल्याचा आरोप आहे. विद्यार्थिनींनी बस थांबविण्याची वारंवार विनंती केली, बसच्या मागे धावतही गेल्या. मात्र बस थांबवली नाही.
 
 
या घटनेनंतर घाबरलेल्या विद्यार्थिनींनी तातडीने आपल्या पालकांशी संपर्क साधला. संतप्त पालकांनी सेलू बसस्थानक गाठून संबंधित चालक-वाहकांना जाब विचारला. काही काळ बसस्थानक परिसरात तणाव झाला होता. यावेळी संबंधित कर्मचार्‍यांनी दिलगिरी व्यत केली. मात्र, अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने माफी पुरेशी नसून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिका पालक व प्रवाशांनी घेतली आहे.
 
 
वर्धा—नागपूर मार्गावरील काही बस चालकांकडून सेलू बसस्थानकात न जाता बायपास चौकातच प्रवाशांना उतरवल्या जाते. याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही कारवाई न झाल्याने कर्मचार्‍यांची मनमानी वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
त्यामुळे त्या बसचा चालक-वाहकांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, तसेच सर्व एसटी बसेस सेलू बसस्थानकात थांबण्याचे सत आदेश देण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
 
नियमानुसार कारवाई
 
 
विद्यार्थिनींना रात्री बसस्थानकाऐवजी अन्य ठिकाणी सोडण्यात आल्याची बाब अत्यंत गंभीर आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून, संबंधित चालक-वाहक दोषी आढळल्यास नियमानुसार कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. यापुढे सर्व बसांनी सेलू बसस्थानकातच थांबून प्रवासी चढ-उतार करावेत, अशा स्पष्ट सूचना देण्यात येतील. प्रवाशांनी अशा प्रकारच्या तक्रारी तातडीने आगार प्रशासनाकडे नोंदवाव्या असे वाहतूक नियंत्रक इरफान शेख यांनी सांगितले.