म्युल अकाउंट सायबर फसवणूक प्रकरणी तिघांना अटक

-देशभरातील 6 नागरिकांची 6.93 लाखांची फसवणूक -मास्टरमाईंड नागपुरातून जेरबंद

    दिनांक :04-Aug-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
mule-account-cyber-fraud-case : ‘म्युल अकाउंट’चा वापर करून देशभरातील नागरिकांची लाखो रुपयांची सायबर फसवणूक केल्याप्रकरणी यवतमाळ शहर पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारालाही नागपुरातून अटक करण्यात आली आहे. यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात सायबरचे अभिनव बोंदरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात बँक ऑफ महाराष्ट्रच्या यवतमाळ शाखेतील एका खात्याचा वापर सायबर फसवणुकीतील रक्कम स्वीकारण्यासाठी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
 
 
J
 
 
संबंधित खात्यामार्फत 18 फेब्रुवारी 2026 रोजी एकूण 6 लाख 93 हजार रुपयांचे व्यवहार झाले. यात देशभरातील 6 नागरिकांची फसवणूक झाल्याचे उघड झाले. या प्रकरणी भान्यासं 2023 मधील कलम 318 (4), 319 (2), 3 (5) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 (क) व 66 (ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
 
 
तपासादरम्यान संबंधित खातेदार रत्नपाल उर्फ रतन जनार्धन कांबळे (दाभडी, जि. यवतमाळ) याला 21 जुलै रोजी अटक करण्यात आली. चौकशीत त्याला खाते उघडण्यासाठी मदत करणारा राहुल गजानन खंडारे (दाभडी, जि. यवतमाळ) असल्याचे निष्पन्न झाले. मात्र रत्नपालला अटक झाल्याची माहिती मिळताच राहुल पुण्याला फरार झाला.
 
 
तपासात या संपूर्ण रॅकेटचा मास्टरमाईंड आदित्य मधुकर लांजेवार (रा. बुटीबोरी, नागपूर) असल्याचे समोर आले. रत्नपालच्या अटकेनंतर तोही राजस्थानला पळून गेला होता. पोलिसांनी तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे त्याच्यावर लक्ष ठेवले. तो नागपुरात परतल्याची माहिती मिळताच पथकाने त्याला ताब्यात घेऊन अटक केली. चौकशीत त्याने संबंधित बँक खाते राजस्थानमधील एका डिलरला विकल्याची कबुली दिली. त्यानंतर 3 ऑगस्ट रोजी यवतमाळात आलेल्या राहुल खंडारेलाही अटक करण्यात आली.
 
 
ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर अधीक्षक अशोक थोरात व उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार निलेश सुरडकर, उपनिरीक्षक निलेश मिश्रा, तसेच भरत राठोड, रवी नेवारे, अंकुश फेंडर व धीरज घोसे यांच्या पथकाने केली.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
 
 
सायबर फसवणुकीसाठी कोणालाही स्वतःचे बँक खाते किंवा मोबाईल क्रमांक वापरण्यास देऊ नये. अशा प्रकारे खाते किंवा मोबाईलचा वापर होऊ दिल्यास संबंधितांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा यवतमाळ शहर पोलिसांनी दिला आहे.