नवी दिल्ली,
air-india-flight : थायलंडमधील फुकेत येथून भारताची राजधानी दिल्लीच्या दिशेने उड्डाण केलेल्या विमानात आकाशात अचानक भयानक वातावरणीय गोंधळ निर्माण झाल्याने मोठा थरार घडला. प्रवासादरम्यान विमान अचानक अतिशय तीव्र झटक्यांचा (टर्ब्युलन्स) शिकार झाले आणि अत्यंत वेगाने खाली येऊ लागले. या अचानक झालेल्या बदलामुळे आणि विमानात निर्माण झालेल्या प्रचंड हवेच्या दबावामुळे तब्बल १२ प्रवासी जखमी झाले असून काहींच्या मान व कानाला गंभीर दुखापती झाल्या आहेत.

दिल्लीत विमान उतरण्याच्या काही वेळ आधीच आकाशात अचानक हा प्रकार घडला. विमान अचानक खाली येऊ लागल्याने आणि हिचकोळे खाऊ लागल्याने विमानात प्रवाशांची प्रचंड आरडाओरड सुरू झाली अन् भीतीचे वातावरण पसरले. एका प्रवाशाच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, विमानाची उंची अचानक वेगाने कमी झाल्यामुळे आतमध्ये तीव्र हवेचा दबाव तयार झाला. या दाबामुळे त्यांच्या भावाच्या कानाला गंभीर दुखापत झाली असून कान फाटला आहे, तर दुसऱ्या एका प्रवाशाच्या खांद्याला जोरदार झटका बसला आहे. अशा अत्यंत बिकट परिस्थितीतही वैमानिकाने मोठ्या कौशल्याने विमानावर ताबा मिळवला आणि दिल्ली विमानतळावर विमानाचे सुरक्षित उतरण (लँडिंग) घडवून आणले.
या घटनेवर स्पष्टीकरण देताना विमान कंपनीने सांगितले की, उड्डाणादरम्यान अचानक निर्माण झालेल्या हवामानाच्या समस्येमुळे विमानाला झटके बसले. जखमी झालेल्या प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना तातडीने विमानतळावरील आरोग्य केंद्रात नेऊन वैद्यकीय तपासणी आणि उपचार पुरवण्यात आले आहेत. प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता हीच आपली सर्वोच्च प्राथमिकता असून, बाधित प्रवाशांना सर्व प्रकारची मदत पुरवली जात आहे आणि या घटनेच्या तपासात संबंधित यंत्रणांना पूर्ण सहकार्य केले जात आहे.
दरम्यान, आकाशात हवेचा प्रवाह असमान आणि अनियमित होतो, तेव्हा असा वातावरणीय गोंधळ निर्माण होतो. सहसा हवा शांत आणि स्थिर थरांमध्ये वाहते, परंतु जमिनीच्या उष्णतेमुळे गरम हवा वर जाणे, ठंडी हवा खाली येणे, पर्वतांना हवा धडकणे किंवा उंचावरील वेगात वाहणारे वारे यांमुळे हवेची रचना बिघडते. या काळात विमानाला अचानक वर-खाली किंवा डावीकडे-उजवीकडे जोरदार झटके बसतात.