लग्न मोडल्यानंतर तरुणीला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी

- आरोपी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

    दिनांक :04-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर,
young-woman-threatened : लग्न ठरल्यानंतर साखरपुडा झाला आणि दोन्ही कुटुंबीयांमध्ये वितृष्ठ निर्माण झाले. त्यामुळे निश्चित तारखेला ठरलेला विवाह परस्पर संमतीने मोडण्यात आला. त्यानंतर त्या तरुणी अश्लील मॅसेज पाठवून मानसिक छळ करणे तसेच तिचे अश्लील फोटो व वैयक्तिक जीवनातील माहिती सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी युवकाने दिली. तसेच अश्लील शिवीगाळ करुन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी वाठोडा पोलिसांनी ३० वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
 
 
 
JK
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार २८ वर्षीय तरुणी वाठोडा परिसरात राहते. तिची ओळख नरेंद्रनगर येथील वसुधरा कॉम्प्लेक्समध्ये राहणारा एकांश कुंभलकर (३०) याच्याशी 'जीवनसाथी' या विवाह संकेतस्थळाद्वारे झाली होती. विवाहाच्या उद्देशाने दोघांमध्ये ओळख वाढली. दोघांनी एकमेकांना समजून घेण्यासाठी भेटी घेतल्या. खासगी क्षण सोबत घालवले. दोघांचे सूर जुळल्यामुळे ३१ जुलै २०२५ रोजी त्यांचा साखरपुडा झाला. त्यानंतर २ डिसेंबर २०२५ रोजी विवाह निश्चित करण्यात आला होता. त्यानंतर तो युवक होणाऱ्या पत्नीला घेऊन फिरायला गेला. तिच्यासोबत आयुष्यातील खासगी क्षण घालवले. त्यानंतर मात्र, तो तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायला लागला. तिच्या जीवनातील पूर्वेतिहासावर भाष्य करुन तिला डिचवायला लागला. कालांतराने आरोपीचे वर्तन आपल्याशी जुळत नसल्याचे तरुणीच्या लक्षात आले.
 
 
त्यामुळे दोन्ही कुटुंबीयांच्या परस्पर संमतीने विवाह रद्द करण्यात आला. विवाह मोडल्यानंतर आरोपी संतप्त झाला. त्याने तरुणीला तिचे अश्लील फोटो आणि खासगी जीवनातील वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. तसेच फेसबुक व इन्स्टाग्रामद्वारे वारंवार अश्लील व लैंगिक कृत्याबाबतचे मॅसेज पाठवणे, शिवीगाळ करणे, बदनामी करण्याची धमकी देणे आणि ऑनलाइन पाठलाग (सायबर स्टॉकिंग) करून तिला मानसिक त्रास दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे तरुणीच्या सन्मानाला धक्का पोहोचल्याचेही तिने पोलिसांना सांगितले. या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ५ फेब्रुवारी २०२६ ते ३ ऑगस्ट २०२६ या कालावधीत घडल्याचे पोलिसांनी सांगितले असून, वाठोडा पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.