अनिल कांबळे,
नागपूर,
abduction-and-rape-of-a-girl : वर्धा येथील एका उच्चपदस्थ शासकीय अधिकाऱ्याच्या १६ वर्षीय मुलीचे अपहरण करुन तिला एका बंद खोलीत डांबून ठेवण्यात आले. तिच्यावर सलग दोन दिवस लैंगिक अत्याचार करण्यात आला. हुडकेश्वर पोलिसांनी त्या ओलीस धरुन ठेवलेल्या मुलीच्या ठिकाण शोधून काढून तेथे सापळा रचून आरोपीला शस्त्रासह ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्याची १६ वर्षीय मुलीची ठाण्यात राहणाऱ्या ऑनलाईन गेम खेळताना एका युवकाशी ओळख झाली. त्याने तिला जाळ्यात ओढले. त्यानंतर प्रेमाचे आमिष दाखवत तिचा विश्वास संपादन केला आणि तिला कुटुंबापासून दूर केले. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अनेकवेळा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच धमकावून आणि भीती दाखवून तिला आपल्या ताब्यात ठेवण्यात आले होते. आरोपी युवक हा सायबर हॅकर असून त्याने मुलीचा मोबाईल हॅक केला होता. दोन दिवसांपूर्वी त्याने मुलीला भेटायला बोलावले. त्यानंतर तिला ओलीस धरले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दुसरीकडे हुडकेश्वर ठाण्यात त्या अधिकाऱ्याने अपरहणाची तक्रार नोंदवली. पोलिस निरीक्षक अनामिक मिर्झापूरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस उपनिरीक्षक दीपक मोरे यांच्या पथकाने मुलीचे लोकेशन काढून शोध घेतला. तो एका खोलीत मुलीसह असल्याचे लक्षात येताच तेथे सापळा रचला.
अचूक माहिती मिळाल्यानंतर हुडकेश्वर पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. पोलिसांनी बंद खोलीचा दरवाजा फोडून आत प्रवेश केला आणि आरोपीला घटनास्थळीच ताब्यात घेतले. पीडित मुलीची सुटका करून तिला तातडीने वैद्यकीय उपचार, समुपदेशन आणि आवश्यक संरक्षण उपलब्ध करून देण्यात आले. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली असून, त्याच्याकडील मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि अन्य डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत. त्यांची फॉरेन्सिक तपासणी सुरू असून डीएनए, फिंगरप्रिंटसह अन्य वैज्ञानिक पुरावेही संकलित केले जात आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपीने २ ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलीला आपल्या ठिकाणी बोलावून घेतले आणि तिचा मोबाईल स्वतःकडे ठेवून बंद केला. त्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी हुडकेश्वर पोलिसांकडे धाव घेतली. ३ ऑगस्टच्या रात्री पोलिसांनी आरोपीच्या संभाव्य ठिकाणी शोधमोहीम राबविली; मात्र सुरुवातीला तो सापडला नाही. याचदरम्यान एका फूड डिलिव्हरी बॉयची चौकशी केली असता महत्त्वाची माहिती मिळाली. त्याच्याकडून ऑर्डर देण्यात आलेला मोबाईल क्रमांक मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड टाकली. खोलीचा दरवाजा फोडून आत प्रवेश केल्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले आणि पीडित मुलीची सुटका करण्यात आली.
या गंभीर प्रकरणाचा यशस्वी तपास करणाऱ्या पथकाचा सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त रश्मिता राव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चंदा दंडवते, एएसआय दीपक मोरे, हवालदार दिनेश गाडेकर, पोलीस शिपाई प्रज्वल वाणी तसेच सायबर सेलचे हिमांशू पाटील आणि अभिषेक पांडे यांनी या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.