नवी दिल्ली,
Abhijit Deepak to enter politics जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर चर्चेत आलेले 'कॉकरोच जनता पार्टी' (सीजेपी)चे संस्थापक अभिजीत दीपक आता आपल्या पुढील वाटचालीची दिशा निश्चित करण्याच्या तयारीत आहेत. यासाठी त्यांच्या निवासस्थानी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीत संघटनेचा पुढील अजेंडा आणि भविष्यातील रणनीतीवर चर्चा होणार आहे.यापूर्वी दिलेल्या मुलाखतीत अभिजीत दीपक यांनी सध्या राजकारणात प्रवेश करण्याचा कोणताही निश्चित निर्णय घेतलेला नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, भविष्यातील शक्यता त्यांनी पूर्णपणे फेटाळली नव्हती. त्यांनी सांगितले की, देशातील तरुण पिढीला कोणते प्रश्न सर्वाधिक महत्त्वाचे वाटतात, हे जाणून घेण्यासाठी समर्थकांशी संवाद साधला जाणार आहे.
अभिजीत दीपक यांच्या मते, बुधवारपासून दोन दिवस विविध समर्थक आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठका होणार असून, त्यामध्ये 'कॉकरोच जनता पार्टी'चा मुख्य अजेंडा निश्चित केला जाईल. तसेच सामाजिक चळवळ अधिक प्रभावीपणे कशी पुढे नेता येईल, यावरही चर्चा होणार आहे.निवडणूक लढवण्याच्या प्रश्नावर त्यांनी सध्या स्पष्ट नकार दिला असला, तरी भविष्यात जनतेची व्यापक मागणी झाल्यास पक्ष स्थापन करून निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. जनतेच्या इच्छेला प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.अभिजीत दीपक यांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत नवीन राजकीय पक्ष स्थापन करणे हा सर्वोत्तम पर्याय वाटत नाही.
त्यांच्या मते, देशाला अशा व्यापक जनआंदोलनाची गरज आहे, जे लोकांचा विविध संस्थांवरील विश्वास पुन्हा निर्माण करेल आणि उत्तरदायित्व मजबूत करेल. त्यामुळे 'कॉकरोच जनता पार्टी' सध्या देशातील तरुणांचे प्रश्न आणि त्यांच्या आवाजाला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यावर भर देणार आहे.राजकारणी, न्यायव्यवस्था आणि प्रसारमाध्यमांबाबत अनेक तरुणांमध्ये विश्वास कमी झाल्याचा दावा करत त्यांनी सांगितले की, जर 'कॉकरोच जनता पार्टी'ने सातत्याने तरुणांचे प्रश्न मांडले, सरकारवर लोकहिताच्या मुद्द्यांवर दबाव कायम ठेवला आणि आपली चळवळ प्रभावीपणे पुढे नेली, तर भविष्यात जनतेचा व्यापक पाठिंबा मिळू शकतो.