नांदगाव पेठ
accident-near-savardi राष्ट्रीय महामार्गावरील सावर्डी नजीक असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालकासह तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू असताना हा भीषण अपघात घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
accident-near-savardi माहितीनुसार, आयआरबी कंपनीच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर खड्डे बुजविण्याचे काम सुरू होते. यावेळी साहित्याने भरलेला आयआरबी कंपनीचा ट्रक एम एच २७ बीएक्स ७१९२ रस्त्याच्या कडेला उभा होता. दरम्यान एनएल ०१,क्यू ४३२० क्रमांकाचा भरधाव ट्रक अचानक अनियंत्रित होऊन उभ्या ट्रकवर जोरदार आदळला. धडकेनंतर ट्रकने रस्त्यावर काम करणाऱ्या कामगारांनाही फरफटत नेले. या भीषण अपघातात ट्रक चालक शिवचंद श्रीराम पाल (वय ३८, रा. भैदोही, उत्तर प्रदेश) याच्यासह मुकुंदराव श्रीरामजी गणोरकर (वय ५५) आणि देविदास पाटील (वय ५३, दोघेही रा. चित्तूर, ता. आष्टी, जि. वर्धा) यांचा जागीच मृत्यू झाला. भूषण पांडुरंग गणोरकर , दिलीप भरापे (रा. मोझरी) आणि अशोक उके हे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
accident-near-savardi अपघाताची माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. अपघातामुळे काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.