गोंदिया
gondia-protest धापेवाडा येथे एसटी बस नियमितपणे थांबत नसल्याच्या निषेधार्थ विद्यार्थी व ग्रामस्थांनी मंगळवारी 4 ऑगस्ट रोजी सकाळी आंदोलन केले. सकाळी सुमारे 8.15 वाजता संतप्त विद्यार्थ्यांनी दोन्ही बाजूंच्या एसटी बसेस अडवून वाहतूक रोखून धरली. त्यामुळे दोन्ही मार्गांवर वाहनांच्या रांगा लागून वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
gondia-protest शाळा व महाविद्यालये सुरू झाल्याने धापेवाडा परिसरातील विद्यार्थी सवलतीच्या पासचा वापर करून दररोज गोंदियाला शिक्षणासाठी ये-जा करतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तिरोडा-गोंदिया मार्गावरील बस धापेवाडा येथे पोहोचेपर्यंत प्रवाशांनी पूर्ण भरलेली असते. त्यामुळे धापेवाडा तसेच नवेगाव, निलागोंडी, रत्नारा, हिवरा, कुडवा आदी गावांतील विद्यार्थ्यांना बसमध्ये प्रवेश मिळत नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. सध्या तिरोडा ते गोंदिया मार्गावर धापेवाडामार्गे सकाळी 8 व 9 वाजता बससेवा सुरू आहे. मात्र, या बस तिरोडा येथूनच भरून येत असल्याने धापेवाडा येथील विद्यार्थ्यांना त्याचा पुरेसा लाभ मिळत नाही.
gondia-protest दरम्यान, या मार्गावर सकाळच्या वेळेत अतिरिक्त बससेवा सुरू करण्याची मागणी विद्यार्थी व ग्रामस्थांनी केली असता संबंधित विभागाकडून याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान, आंदोलनाची माहिती मिळताच लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेत विद्यार्थी व पालकांची समजूत घातली. एसटी विभागाच्या अधिकार्यांशी चर्चा करून योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.