नवी दिल्ली,
Ajit Agarkar's position is in jeopardy भारतीय क्रिकेट नियामक मंडळात (बीसीसीआय) मुख्य निवडकर्ता पदाबाबत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वृत्तानुसार, सध्याचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांची जागा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण घेऊ शकतात. सध्या लक्ष्मण बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई)चे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत आणि नव्या मुख्य निवडकर्त्यांच्या शर्यतीत त्यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. एका वृत्तानुसार, इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान रोहित शर्माला भविष्यातील योजनांमधून वगळण्याचा प्रस्ताव अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने संघ व्यवस्थापनासमोर मांडला होता. त्यावेळी रोहित शर्मा लॉर्ड्सवरील सामना हा आपल्या कारकिर्दीतील अखेरचा एकदिवसीय सामना ठरू शकतो, अशा चर्चांनाही वेग आला होता.
मात्र, लॉर्ड्सवरील सामन्यात रोहित शर्माने ११० चेंडूत १३८ धावांची दमदार खेळी करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये लॉर्ड्स मैदानावर भारताकडून झळकलेले हे पहिले शतक ठरले. या खेळीनंतर निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित झाले.वृत्तात असा दावाही करण्यात आला आहे की, भारतीय संघाच्या व्यवस्थापनातील काही जणांना रोहित शर्मा २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाचा भाग असावा असे वाटत नाही. दरम्यान, बीसीसीआय लवकरच आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्याचा आढावा घेण्यासाठी बैठक घेणार असून, त्यामध्ये मुख्य निवडकर्ता पदाबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.
अजित आगरकर यांचा कार्यकाळ जून २०२६ मध्ये संपला होता. मात्र, त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. सुरुवातीला ते २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत या पदावर कायम राहतील, अशी अपेक्षा होती. मात्र, सध्याच्या घडामोडींमुळे त्यांच्या भवितव्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.व्हीव्हीएस लक्ष्मण यांची २०२१ च्या अखेरीस बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सचे संचालक म्हणून नियुक्ती झाली होती. गेल्या पाच वर्षांत त्यांनी युवा क्रिकेटपटूंच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याशिवाय विविध दौऱ्यांमध्ये त्यांनी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वे दौऱ्यात त्यांनी टीम इंडियाचे नेतृत्व केले होते, तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेतही ते भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असणार आहेत. रोहित शर्माच्या भवितव्याबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, जोपर्यंत रोहित शर्मा भारतीय संघाच्या योजनांचा भाग आहे, तोपर्यंत तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी खेळत राहील. लॉर्ड्सवरील सामना हा त्याचा अखेरचा सामना नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, हे निवेदन अजित आगरकर यांना माहिती न देता जारी करण्यात आल्याचेही वृत्तात नमूद करण्यात आले आहे.