अमरावती
amravati-university जागतिक स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठित 'क्युएस आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग २०२६' मध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने उल्लेखनीय कामगिरी करत दमदार झेप घेतली आहे. विद्यापीठाने आशिया खंडात १००१-११०० च्या बँडमध्ये, तर दक्षिण आशियात ३३० वा क्रमांक पटकावून विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्राच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. 'क्युएस वल्र्ड र्युनिव्हर्सिटी रँकिंग २०२६ इयरबुक'मध्ये विद्यापीठाच्या या यशाची अधिकृत नोंद घेण्यात आली आहे.
amravati-university कुलगुरू डाॅ. बारहाते यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाने शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन संस्कृती, नवोपक्रम, विद्यार्थी विकास आणि आंतरराष्ट्रीय निकषांची अतिशय प्रभावीपणे अंमलबजावणी केली. या कक्षाचे संचालक डॉ. संदीप वाघुळे यांनी विविध उपक्रमांचा पाठपुरावा केला. गेल्या दोन वर्षात अंतर्गत गुणवत्ता कक्षामार्फत विद्यापीठात महत्त्वाचे सकारात्मक बदल घडवून आणण्यात आलेत. प्रत्येक शिक्षकासाठी दरवर्षी किमान तीन दर्जेदार संशोधन निबंध प्रकाशित करण्याचे धोरण आखण्यात आले. स्कोपस, डब्ल्यूओएस आणि यूजीसीच्या निकषांनुसार संशोधनाचे अंतर्गत परीक्षण सुरू करण्यात आले. सर्व विभागांमध्ये मूल्यवर्धित कोर्सेसची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली. एपीआय प्रमाणपत्र प्रणाली आणि सीएएस (करिअर ॲडव्हान्समेंट स्कीम) प्रक्रियेला गती तसेच परीक्षेचे निकाल जाहीर करण्याचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी करण्यात आला.
amravati-university त्याचबरोबर 'स्कुल कनेक्ट' कार्यक्रम, संलग्न महाविद्यालयांच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे मार्गदर्शन, माजी विद्यार्थ्यांचा सहभाग आणि उद्योग जगतासोबतच्या सामंजस्य करारांमध्ये वाढ करण्यात आली. संशोधन आणि विद्यार्थी विकासात सकारात्मक बदल या उपक्रमांमुळे विद्यापीठातील उच्च दर्जाच्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधील संशोधन प्रकाशनात मोठी वाढ झाली आहे. याशिवाय पेटंट्सची संख्या, संशोधन फेलोची संख्या, विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट, उच्च शिक्षणातील प्रवेश, आणि क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरीत कमालीची सुधारणा दिसून येत आहे.
"हे यश विद्यापीठातील सर्व शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, संशोधक, विद्यार्थी आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या सामूहिक प्रयत्नांचे फळ आहे. गुणवत्ता, संशोधन, नवोपक्रम आणि उद्योग सहकार्यावर अधिक भर देत अमरावती विद्यापीठाला जागतिक स्तरावर नवीन उंचीवर नेण्याचा आमचा संकल्प आहे."
- डॉ. मिलिंद बारहाते
कुलगुरू, अमरावती विद्यापीठ