मुंबई,
Ban on analogue paneer in Maharashtra महाराष्ट्रातील ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठा निर्णय घेतला आहे. राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अॅनालॉग अर्थात नॉन-डेअरी पनीरच्या उत्पादन, साठवणूक, विक्री आणि वापरावर राज्यभर एक वर्षासाठी बंदी लागू केली आहे. यासंदर्भातील आदेश अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला असून, तो अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील कलम ३०(२)(अ) अंतर्गत जारी करण्यात आला आहे. एफडीएच्या नियमांनुसार ‘पनीर’ म्हणून विकल्या जाणाऱ्या उत्पादनात दुधातील स्निग्धांश असणे अनिवार्य आहे. मात्र, दुधाऐवजी वनस्पती तेल, वनस्पती स्निग्धांश किंवा इतर दुग्धेतर घटकांचा वापर करून तयार केलेले उत्पादन हे ‘दुग्ध अॅनालॉग’ मानले जाते. अशा उत्पादनाला पनीर म्हणून विक्री करणे किंवा ग्राहकांना पनीर म्हणून देणे कायद्याचे उल्लंघन मानले जाईल.

या निर्णयाचा परिणाम राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, भोजनालये, क्लाऊड किचन आणि केटरिंग व्यवसायावर होणार आहे. या आस्थापनांना अॅनालॉग किंवा नॉन-डेअरी पनीर कोणत्याही खाद्यपदार्थात वापरणे, त्याचा साठा ठेवणे, विक्री करणे किंवा ग्राहकांना वाढणे पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.एफडीएने स्पष्ट केले आहे की, ग्राहकांना अस्सल पनीर असल्याचा भास निर्माण करून अॅनालॉग उत्पादनांचा वापर करणे ही दिशाभूल करणारी बाब आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. संबंधित उत्पादन ‘मिथ्याछापित’ म्हणून जप्त करून नष्ट केले जाईल, तसेच दंडात्मक कारवाईही केली जाईल.
दरम्यान, या आदेशामुळे सर्व प्रकारच्या पनीरवर बंदी आलेली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अन्न सुरक्षा मानकांनुसार तयार करण्यात आलेले नियमित फुल-फॅट पनीर बाजारात खुल्या किंवा पॅकबंद स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहे. तसेच मीडियम-फॅट आणि लो-फॅट पनीरची विक्री केवळ सीलबंद पॅकेजमध्ये आणि अन्न सुरक्षा व मानके (लेबलिंग व प्रदर्शन) नियम, २०२० नुसार आवश्यक माहिती नमूद करूनच करता येणार आहे.अॅनालॉग पनीर हे दिसायला साध्या पनीरसारखे असले तरी ते पूर्णपणे किंवा अंशतः वनस्पती तेल, वनस्पती स्निग्धांश आणि इतर दुग्धेतर घटकांपासून तयार केले जाते. अशा उत्पादनाच्या पॅकेजिंगवर अॅनालॉग पनीर’, ‘अॅनालॉग चीज’ किंवा ‘दुग्धविरहित उत्पादन’ असा उल्लेख असतो. घटकांच्या यादीत 'वनस्पती चरबी' किंवा 'हायड्रोजनेटेड तेल' असे नमूद असल्यास ते अॅनालॉग पनीर असल्याचे ओळखता येते. याशिवाय, त्याची चव आणि पोतही पारंपरिक पनीरपेक्षा अधिक तेलकट किंवा रबरासारखी जाणवते.