मँचेस्टर,
super giants इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या 'द हंड्रेड २०२६' स्पर्धेदरम्यान मँचेस्टर सुपर जायंट्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा नियमित कर्णधार एडन मार्करामने वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धेतील उर्वरित सामन्यांतून माघार घेतली असून तो मायदेशी दक्षिण आफ्रिकेत परतला आहे. त्याच्या अनुपस्थितीत इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जोस बटलर संघाचे नेतृत्व करणार आहे, तर मार्करामच्या जागी न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू मायकल ब्रेसवेलची संघात निवड करण्यात आली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम हा सुपर जायंट्स फ्रँचायझीच्या लखनौ, डर्बन आणि मँचेस्टर या तिन्ही संघांचा भाग आहे. मार्चमध्ये झालेल्या लिलावानंतर त्याच्याकडे मँचेस्टर पुरुष संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने स्पर्धेची सुरुवात सलग दोन विजयांनी केली होती. मात्र त्यानंतर संघाला सलग तीन पराभवांना सामोरे जावे लागले. वैयक्तिक कामगिरीतही मार्करामची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नव्हती. पहिल्या चार डावांत त्याने केवळ ६७ धावा केल्या, मात्र रविवारी ओव्हल मैदानावर त्याने अर्धशतकी खेळी साकारत फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले होते.
मँचेस्टर सुपर जायंट्सने अधिकृत निवेदनात सांगितले की, एडन मार्कराम वैयक्तिक कारणांमुळे दक्षिण आफ्रिकेत परतला असून फ्रँचायझीने त्याच्या योगदानाबद्दल आभार मानत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या जागी जोस बटलर ५ ऑगस्टपासून एमरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड येथे वेल्श फायरविरुद्धच्या सामन्यात संघाचे नेतृत्व करणार आहे.
जोस बटलरसाठी हे कर्णधारपद नवीन नाही. 'द हंड्रेड' स्पर्धेच्या पहिल्या तीन हंगामांत, जेव्हा संघाचे नाव मँचेस्टर ओरिजिनल्स होते, तेव्हाही त्याने कर्णधाराची जबाबदारी सांभाळली होती. मात्र, २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर तो प्रथमच कोणत्याही संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
मार्करामच्या अनुपस्थितीमुळे मँचेस्टर सुपर जायंट्सला या मोसमात प्रथमच आपल्या अंतिम अकरामध्ये बदल करावा लागणार आहे. यापूर्वी संघाने सलग पाच सामन्यांत एकाच संघावर विश्वास दाखवला होता. सध्या मँचेस्टर सुपर जायंट्सने पाच सामन्यांत दोन विजय आणि तीन पराभवांसह गुणतालिकेत सहावे स्थान कायम ठेवले आहे.