कर्जमाफीची तारीख आली...पण पैसा खात्यात कधी?

    दिनांक :05-Aug-2026
Total Views |
मुंबई,
date for loan waiver has arrived राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेच्या निधीची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. ठरलेल्या दिवशी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणे अपेक्षित असताना तांत्रिक अडचणींमुळे प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.राज्य सरकारने आतापर्यंत १६ लाख ९६ हजार पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे. त्यापैकी ११ लाख ४६ हजार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. पुढील लाभार्थी यादी ५ किंवा ६ ऑगस्ट रोजी जाहीर होण्याची शक्यता असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.
 
 
 
date for loan waiver has arrived
 
त्यांच्या माहितीनुसार, सुमारे ११ लाख शेतकऱ्यांना जवळपास ८ हजार कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. मात्र, सुमारे १३ लाख खात्यांमध्ये आधार क्रमांकातील त्रुटी, कर्जावरील व्याजाची माहिती आणि इतर तांत्रिक बाबींमध्ये विसंगती आढळून आली आहे. या त्रुटी दूर करण्यासाठी संबंधित खाती बँकांकडे दुरुस्तीसाठी पाठविण्यात आली आहेत.सहकार मंत्र्यांनी सांगितले की, आयकर विभागाकडील माहिती शासनाला प्राप्त झाली असून त्यामध्ये ९४ लाख आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांचा डेटा समाविष्ट आहे. सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर कृषी सन्मान योजनेतील पात्र शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
 
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदतीच्या पीक कर्जांचा समावेश करण्यात आला आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेल्या कर्जांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.पात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित बँकांनी महाआयटीच्या पोर्टलवर अपलोड केली असून ग्रामपंचायत कार्यालये, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि बँक शाखांमध्येही ती उपलब्ध करण्यात आली आहे. लाभ मिळवण्यासाठी प्रत्येक पात्र शेतकऱ्याने ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. ही सुविधा राज्यातील सुमारे ३२ हजार 'आपले सरकार सेवा केंद्रां'मार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 
 
दरम्यान, नाशिक जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ३५ हजार ८९० शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. त्यापैकी २७ हजार २८३ शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २३ हजार ७९८ सभासदांपैकी २१ हजार ७१२ शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळणार असून, १७ हजार १७४ जणांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. जिल्हा बँक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अद्याप कोणत्याही शेतकऱ्याच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही. मात्र, सर्व तांत्रिक प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ६ ऑगस्टपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा करण्यास सुरुवात होण्याची अपेक्षा आहे. नाशिक जिल्ह्यातील जिल्हा बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या मिळून ६८ हजार ८५९ खात्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ३५ हजार ८९० शेतकरी पात्र ठरले आहेत.