कोरची
death-trap कोरची-कुरखेडा मार्गावरील बेडगाव घाट परिसर अपघातांसाठी धोकादायक ठरत असून, या मार्गावर वारंवार अपघातांच्या घटना घडत असल्याने वाहनचालक व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आज बुधवारी, 5 ऑगस्ट रोजी सकाळी भरधाव ट्रकने समोरून येणार्या एक्सयूव्हीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात दोन वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
death-trap कुरखेडा येथील रामसुख किसनराम चोयल हे आपल्या एमएच-33एडी-3681 क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या एक्सयूव्ही वाहनातून प्रमोद मेश्राम व तनवी मेश्राम यांच्यासह कुरखेडा येथून राजनांदगावकडे जात होते. सकाळी सुमारे 11 ते 11.15 वाजताच्या दरम्यान पुराडा गावाच्या पुढे बेडगाव घाटात हा अपघात झाला.
death-trap कोरचीच्या दिशेने पुराडाकडे जाणार्या सीजी 07-बीके-8413 क्रमांकाच्या ट्रकच्या चालकाने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून समोरून येणार्या एक्सयूव्हीला जोरदार धडक दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. धडक एवढी जोरदार होती की एक्सयूव्ही वाहन चक्काचूर झाली असून अंदाजे 6 लाख रुपयांचे नुकसान झाले. त्याचवेळी मागून येणार्या एमएच 31 सीजी 3162 क्रमांका नव्याकोर्या टाटापंच वाहनालाही धडक बसून त्याचे अंदाजे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले.
death-trap कोरची-कुरखेडा मार्गावरील बेडगाव घाट हा सुमारे आठ किलोमीटरचा वळणावळणाचा घाट आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी तीव्र वळणे असल्याने वाहनचालकांना विशेष काळजी घ्यावी लागते. मात्र रस्त्याच्या कडेला आवश्यक त्या ठिकाणी मुरूमाचा भराव करण्यात आलेला नसल्याने रस्त्याच्या कडेचा भाग असुरक्षित झाल्याचे दिसून येते.
रस्त्याच्या कडेला योग्य भराव नसणे, वळणावळणाचा घाट आणि वाहनांचा वेग यामुळे अपघाताचा धोका वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यापूर्वीही या मार्गावर लहान-मोठे अपघात घडले असून, वारंवार होणार्या अपघातांमुळे हा मार्ग ‘मृत्यूचा सापळा’ ठरत असल्याची भावना वाहनचालक व स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
बेडगाव घाटातील धोकादायक वळणे, रस्त्याच्या कडेला नसलेला मुरूमाचा भराव आणि अपघातप्रवण ठिकाणांचा विचार करून संबंधित विभागाने तातडीने पाहणी करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. रस्त्याच्या कडेला योग्य भराव करणे, आवश्यक ठिकाणी सुरक्षा उपाययोजना करणे तसेच धोकादायक वळणांवर योग्य दिशादर्शक फलक व इतर सुरक्षात्मक व्यवस्था करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
death-trap या प्रकरणी रामसुख चोयल यांच्या तोंडी तक्रारीवरून पुराडा पोलिस ठाण्यात अपघात क्रमांक 68/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 281, 324 (5) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार रणजीत गावंडे करीत असून, गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलिस हवालदार सुखदेव उईके यांनी केली. प्रभारी अधिकारी सपोनि रविंद्र म्हैसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.