वर्धेत इन्स्टाग्रामवरून वाद; युवकाचे अपहरण अन् जीवे मारण्याचा प्रयत्न

नागपुरातील सहा जणांवर गुन्हा दाखल

    दिनांक :05-Aug-2026
Total Views |
वर्धा,
dispute over instagram in wardha दोन मित्रांमधील इन्स्टाग्रामवरील गंमत युवकाच्या चांगलीच अंगलट आली. नागपुरातील सहा जणांनी त्याला वर्धेतील आर्वी नाका येथे बोलावून चाकूने वार करून जखमी केले. तसेच त्याला चारचाकी वाहनात कोंबून त्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने वाहनातच जबर मारहाण करून जखमी अवस्थेत गाडीच्या बाहेर फेकून दिले. ही थरारक घटना मंगळवार ४ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी तक्रारीवरून रामनगर ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अलंकार राऊत (१६) असे जखमीचे नाव असून मारहाण करणार्यांमध्ये फैजान शेख, लाला खान व अन्य ४ अशा सहा जणांचा समावेश आहे.
 
 
dispute over instagram in wardha
  
मिळालेल्या माहितीनुसार, पवनार येथील अलंकार राऊत हा वर्धेत दहावीत शिक्षण घेत आहे. तर नागपूर येथील फैजान शेख हा अलंकारच्या वर्ग मैत्रिणीचा मित्र आहे. तर शहरातील महादेवपुरा येथील हर्ष तिवाडे हा अलंकारचा मित्र असून हर्षने अलंकारच्या इन्स्टाग्रामवर फैजानचा फोटो पाठवून फैजान तुझ्या पेक्षा स्मार्ट असल्याचा मॅसेज पाठविला. त्याला प्रत्युत्तर देत अलंकारने आपल्या दुचाकीचा फोटो पाठवून फैजानपेक्षा माझ्या दुचाकीचे तोंड स्मार्ट आहे, असा मॅसेज पाठविला. हर्ष आणि अलंकारची ही थट्टा सुरू असतानाच अलंकारला फैजानचा फोन आला आणि तू माझ्याबद्दल असा का बोलत आहे म्हणून दोघांमध्ये वाद झाला. फैजानने अलंकारला शिवीगाळ केली. हा वाद काही दिवसांपासून सुरू असतानाच मंगळवारी रात्री फैजानने लाला खान व अन्य ४ जणांसोबत चारचाकीने वर्धा गाठले आणि अलंकारला फोन करून मला महादेवपुरा येथे भेटायला ये, असे सांगितले. त्यावर अलंकारने भेटण्यास नकार दिला. फैजानने तु कुठे आहेस, मीच तुला भेटायला येतो, असे म्हणताच अलंकारने आर्वी नाक्यावर बोलावले. फैजान सुद्धा मित्रांसोबत आर्वी नाक्यावर पोहोचला.
 
अलंकार तिथे येताच फैजानने त्याला बाजूला नेऊन चाकूने वार केला. हा थरार सुरू असतानाच लाला खानही तिथे आला आणि त्यानेही मारहाण केली. त्यानंतर अलंकारला वाहनात कोंबून नेले. वाहनातही त्याला मारहाण करण्यात आली. फैजानने याला नागपूरला नेऊन मारू, असा दम दिला. जुनापाणी चौकात पुन्हा मारहाण केली. त्यानंतर त्याला सोडून पोबारा केला. अलंकारने अविष्कार देशमुखयाच्याशी संपर्क करून माहिती दिली. अविष्कारने घटनास्थळ गाठूत अलंकारला घेऊन रामनगर पोलिस ठाणे गाठले. या घटनेची तक्रार दिली असून रामनगर पोलिसांनी फैजान शेख, लाला खान आणि अन्य चार जणांविरुद्ध अपहरण, जिवे मारण्याचा प्रयत्न आदी गुन्हा दाखल केला.