'जीवन साधना' पुरस्काराने डॉ. भोगे सन्मानित

    दिनांक :05-Aug-2026
Total Views |
नागपूर,
jeevan sadhana award राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक आणि लोकहिताच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. प्रा. भाऊसाहेब भोगे यांना 'जीवन साधना पुरस्कार' प्रदान करण्यात आला. त्यांच्या दीर्घकालीन समाजोपयोगी कार्याची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. डॉ. भाऊसाहेब भोगे हे विद्या शिक्षण प्रसारक मंडळ आणि अंत्योदय मिशन, देवग्राम या संस्थांचे संस्थापक असून त्यांनी शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास आणि सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रात सातत्याने काम केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, युवकांना रोजगाराभिमुख उपक्रमांशी जोडणे तसेच गरजू आणि वंचित घटकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविणे, यासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते.
 
jeevan sadhana award
 
डॉ. भोगे यांनी आपल्या कार्यकाळात प्रसिद्धीपेक्षा समाजसेवेला अधिक प्राधान्य दिले. त्यांच्या निकटवर्तीयांच्या माहितीनुसार, अनेक प्रसंगी विविध संस्थांकडून देण्यात येणारे पुरस्कार त्यांनी नम्रपणे स्वीकारण्यास नकार दिला होता. यावेळी त्यांची अनुपस्थिती असल्याने सावनेर मतदारसंघाचे आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी त्यांच्या वतीने 'जीवन साधना पुरस्कार' स्वीकारला. साधी राहणी, सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकी ही डॉ. भोगे यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये मानली जातात. त्यांनी उभारलेल्या शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांमधून आज हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असून अनेक कुटुंबांना विविध उपक्रमांचा लाभ झाला आहे. त्यांच्या कार्याचा प्रभाव विदर्भासह राज्यातील विविध भागांत दिसून येतो. 'जीवन साधना पुरस्कार' हा केवळ वैयक्तिक सन्मान नसून समाजसेवा, शिक्षण आणि मानवतेसाठी केलेल्या योगदानाची पोचपावती असल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त केली जात आहे.
 
सौजन्य: तेजेंद्र गिरडे, संपर्क मित्र