मंगरूळनाथ,
attempted murder तालुयातील आसेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्या देपुळ येथील एका महिलेसह तिच्या नातवावर जुन्या वादातून जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्या पिता-पुत्राला येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रत्येकी पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड ठोठावून त्यापैकी ४० हजार रुपये जखमी समाधान शालिकराम वाघमारे यांना नुकसानभरपाई म्हणून अदा करण्याचे आदेश दिले.
देपूळ या गावात १२ फेब्रुवारी २०२२ रोजी जुन्या वादातून आरोपी मोसीन शहा मन्सूर शहा व मन्सूर शहा गुलाब शहा यांनी समाधान शालिकराम वाघमारे यांच्यावर कुर्हाड व सुर्याने गंभीर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी आसेगाव पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६ व ३४ अन्वये चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी मंगरूळनाथ येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रज्ञा एस. काळे यांच्या न्यायालयात झाली. खटल्यात एकूण दहा साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने मोसीन शहा मन्सूर शहा व मन्सूर शहा गुलाब शहा यांच्याविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याचे नमूद करून प्रत्येकी पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची व २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.या प्रकरणी शागिराबी मन्सूर शहा व सलमाबी ऊर्फ माया अख्तर शहा यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. तसेच जखमी समाधान शालिकराम वाघमारे यांना नुकसान भरपाई म्हणून दंडाच्या रकमेपैकी ४० हजार रुपये देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. या प्रकरणात शासनाच्या वतीने अतिरिक्त शासकीय अभियोक्ता एस. के. गिमेकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला. पोलिस उपनिरीक्षक आर. व्ही. खंदारे यांनी गुन्ह्याचा तपास केला. तर महिला पोकॉ परविन भुरीवाले यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.