किचन गार्डनमध्ये लसूण लावणार? आधी हे जाणून घ्या

    दिनांक :05-Aug-2026
Total Views |
garlic in the kitchen garden आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण रसायनमुक्त आणि सेंद्रिय भाज्यांना प्राधान्य देत आहेत. त्यामुळे घरातील किचन गार्डनची लोकप्रियताही वाढत आहे. अशा परिस्थितीत लसूण हे सहज आणि कमी खर्चात घरच्या घरी पिकवता येणारे पीक ठरू शकते. भारतीय स्वयंपाकातील महत्त्वाचा घटक असलेला लसूण बाजारात अनेकदा रासायनिक फवारणीमुळे चर्चेत असतो. त्यामुळे स्वतःच्या किचन गार्डनमध्ये पारंपरिक पद्धतीने लसूण पिकवणे हा सुरक्षित आणि फायदेशीर पर्याय ठरू शकतो.
 
garlic in the kitchen garden
 
लसूण लागवडीसाठी मोठी जागा किंवा जास्त खर्चाची गरज नसते. घरातील कुंडी, ग्रो बॅग किंवा वापरात नसलेले प्लास्टिकचे डबे यांचाही वापर करून सहज लागवड करता येते. योग्य पद्धतीने लागवड केल्यास काही महिन्यांत ताजा, सुगंधी आणि स्थानिक लसूण तयार होतो. लसूण लागवडीसाठी ऑक्टोबर ते नोव्हेंबर हा सर्वात योग्य हंगाम मानला जातो. या काळात वातावरण सौम्य थंड असल्याने मुळांची वाढ चांगली होते आणि कंदांची वाढही उत्तम प्रकारे होते.
 
लागवडीपूर्वी मातीची योग्य तयारी करणे आवश्यक असते. पाण्याचा निचरा व्यवस्थित होणारी आणि भुसभुशीत माती लसणासाठी अधिक उपयुक्त ठरते. यासाठी सामान्य बागेच्या मातीत सुमारे ४० टक्के गांडूळ खत किंवा जुने कुजलेले शेणखत मिसळावे. तसेच थोडे कोकोपीट किंवा नदीची वाळू मिसळल्यास माती अधिक हलकी राहते आणि लसणाचे कंद व्यवस्थित वाढण्यास मदत होते. तज्ज्ञांच्या मते, कठीण किंवा चिकणमातीमध्ये लागवड टाळावी. अशा मातीत कंदांचा आकार लहान राहण्याची शक्यता असते. तयार केलेली माती कुंडीत भरल्यानंतर ती एक ते दोन दिवस उन्हात ठेवावी. त्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते आणि लसूण लागवडीसाठी योग्य वातावरण तयार होते.