गजनीचे अभिनेते प्रदीप रावत यांचे निधन

    दिनांक :05-Aug-2026
Total Views |
मुंबई,
pradeep rawat passes away बॉलिवूडसह दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे निधन झाले आहे. ७४ वर्षीय प्रदीप रावत यांनी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला. गेल्या पाच वर्षांपासून ते रक्ताच्या कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्या निधनामुळे हिंदीसह विविध भाषांतील चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.
 
pradeep rawat passes away
 
माहितीनुसार, उपचारांनंतर काही काळ त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र काही महिन्यांपूर्वी कर्करोगाने पुन्हा डोके वर काढले. प्रकृती अधिक खालावल्याने गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. प्रदीप रावत यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली वाहिली. अभिनेता सोनू सूद यांनी त्यांचा फोटो शेअर करत, "प्रदीप रावत भाई, तुमची आठवण नेहमीच येत राहील," अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. तर अभिनेता आयुषपाल शर्मा यांनी 'गजनी'मधील गजनी आणि 'लगान'मधील देवा या त्यांच्या संस्मरणीय भूमिकांची आठवण करून त्यांना आदरांजली अर्पण केली.
 
प्रदीप रावत यांनी आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात बी.आर. चोप्रा यांच्या गाजलेल्या 'महाभारत' मालिकेत अश्वत्थामाची भूमिका साकारून केली होती. त्यानंतर 'तहकीकत', 'चंद्रकांता', 'युग' आणि 'गुल सनोबर' यांसारख्या लोकप्रिय दूरदर्शन मालिकांमधून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. हिंदीबरोबरच तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम, बंगाली आणि भोजपुरी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. 'लगान', 'सरफरोश', 'गजनी', 'बैजू बावरा', 'आवरापन' आणि 'ग्रँड मस्ती' यांसारख्या हिंदी चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांनी 'साई' या तेलुगू चित्रपटातून पदार्पण केले आणि त्यानंतर अनेक प्रभावी खलनायकांच्या भूमिका साकारल्या.
 
२००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या तमिळ 'गजनी' चित्रपटातील त्यांच्या खलनायकाच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. त्यानंतर हिंदीतील 'गजनी'च्या रिमेकमध्येही त्यांनी तीच भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली. याशिवाय 'पॅरोडी' (कन्नड), 'चायना टाऊन' (मल्याळम), 'हीरो ४२०' (बंगाली) आणि 'क्रॅक फायटर' (भोजपुरी) या चित्रपटांमध्येही त्यांनी उल्लेखनीय काम केले. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झालेला 'चावा' हा त्यांचा शेवटचा हिंदी चित्रपट ठरला.