गोंडमोहाडी ग्रामपंचायतीचे ‘आदिशक्ती अभियान’ जिल्ह्यात अव्वल

महिला सक्षमीकरणासह विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी

    दिनांक :05-Aug-2026
Total Views |
तिरोडा
adishakti-abhiyan राज्य शासनाच्या आदिशक्ती अभियानांतर्गत महिला सक्षमीकरण, स्वावलंबन, आरोग्य जनजागृती, शिक्षण, स्वच्छता, पोषण तसेच शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल गोंडमोहाडी ग्रामपंचायतीने गोंदिया जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ग्रामपंचायतीच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळाला आहे.
 
aadishakti
 
गोंडमोहाडी ग्रामपंचायतीने आदिशक्ती अभियानाच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच त्यांच्यात आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि शासकीय योजनांविषयी जनजागृती करण्यावर भर दिला. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. अभियानाच्या उपक्रमांना ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सरपंच टिकेश्वरी शहारे यांच्या नेतृत्वाखाली अभियानाच्या अध्यक्षा ममता बोपचे यांच्यासह जागेश्वर निमजे, संगीता भगत, योगिता बोपचे, प्रभा राऊत, सुभाष कावळे, छोटेलाल भगत, कन्हैया शहारे, कल्पना सोमवंशी, शोभाराम बारसागडे, प्रभू बागडे, चभारू उदेपुरे, मंदा देलनकार, बिरजूला तिडके, हेमलता उदेपुरे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, बचत गटांच्या सदस्यांनी अभियानात सक्रिय सहभाग नोंदविला.
 
महिला सक्षमीकरण, आरोग्य व स्वच्छता, पोषण, शिक्षण, आर्थिक स्वावलंबन, शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि बचत गटांचे बळकटीकरण अशा विविध क्षेत्रांत अभियानांतर्गत उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांमुळे महिलांचा सहभाग वाढण्यासोबतच शासनाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यास मदत झाली. गोंदिया जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळाल्यानंतर गोंडमोहाडी ग्रामपंचायतीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
यांचे मिळाले सहकार्य..
अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गटविकास अधिकारी संघमित्रा कोल्हे, गटशिक्षणाधिकारी अरुण गिरेपुंजे, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी विनोद चौधरी, ग्रामसेवक सुमेध बन्सोड, मुख्याध्यापक मनोज रहांगडाले, पदवीधर शिक्षक दिलीप हिरापुरे आणि सहाय्यक शिक्षक हिरालाल सोनवणे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.