नेपाळचे आयात खाद्य तेल वर्धेत जप्त

एफडीएची मोठी कारवाई

    दिनांक :05-Aug-2026
Total Views |
वर्धा,
oil from nepal seized in wardha अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी शहरातील पटेल चौक परिसरातील कादर भाई सन्स या व्यावसायिक प्रतिष्ठानावर छापा टाकून तब्बल २.१० लाखांचे सोयाबीन खाद्य तेल जप्त केले. विशेष म्हणजे, सदर तेल नेपाळवरून आयात केले असल्याचे एफडीएच्या चौकशीत पुढे आले आहे. ही कारवाई मंगळवार ४ रोजी करण्यात आली. काही महिन्यांपूर्वी अन्न व औषध विभागाच्या नागपूर व वर्धा येथील अधिकार्यांनी गो-संवर्धन गोरस भंडारवर धाड टाकून कारवाई केली होती. मंगळवारी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांनी नियमित कामकाज करीत असतानाच शहरातील पटेल चौक परिसरातील मे. कादर भाई सन्स या व्यावसायिक प्रतिष्ठानावर धाड टाकली.
 
 
oil from nepal seized in wardha
 
अन्न सुरक्षा अधिकारी रविराज धाबर्डे यांनी या प्रतिष्ठानाची पाहणी केली असता या आस्थापनेत रिफाइंड सोयाबीन तेल (सुपर सूर्या ब्रॅण्ड) १५ किलोचे कंपनी पॅक टिन मोठ्या संख्येने विक्रीकरिता आढळून आले. सदर तेलाच्या पिंपांची पाहणी केली असता टिन अत्यंत अस्वच्छ व गंज लागलेले आढळले. तसेच सदर रिफाइंड सोयाबीन तेल हे नेपाळवरून आयात केल्याचे आढळून आले. सदर तेल बाजारभावापेक्षा कमी दरामध्ये उपलब्ध असल्याने तेलाच्या शुद्धतेबाबत शंका निर्माण झाली. त्यामुळे अन्न सुरक्षा मानदे कायद्यानुसार अन्न नमुना विश्लेषणाकरिता घेऊन उर्वरित साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत एफडीएच्या अधिकार्यांनी ८८ टिन मधील १३१८ किलो तेल जप्त केले आहे. याची किंमत २ लाख १० हजार ८८० रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले.
 
जप्त करण्यात आलेल्या तेलाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. प्रयोगशाळेकडून संबंधित तेलाच्या विश्लेषणाचा अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कारवाई अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न विभागाच्या अधिकार्यांकडून केली जाणार आहे. पटेल चौकातील व्यावसायिक प्रतिष्ठानातून २.१० लाखांचे खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे. तेलाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई केली जाईल. अत्र पदार्थाच्या शुद्धतेबाबत कोणतीही शंका निर्माण झाल्यास नागरिकांनी त्वरित अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती द्यावी, किंवा ऑनलाइन पोर्टलवर तक्रार करावी, असे आवाहन एफडीएचे सहाय्यक आयुक्त प्रफुल्ल टोपले यांनी केले आहे.