एआयने तयार केलेल्या कंटेंटवर लेबल बंधनकारक!

ईयूचे नवे नियम लागू

    दिनांक :05-Aug-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
labeling for AI-generated content कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर जगभरात वेगाने वाढत असताना, त्याचा गैरवापर रोखण्यासाठी युरोपियन युनियनने (ईयू) कठोर नियम लागू केले आहेत. २ ऑगस्टपासून संपूर्ण युरोपियन युनियनमध्ये हे नियम अंमलात आले असून, एआयच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या फोटो, व्हिडिओ, ऑडिओ आणि मजकुराबाबत पारदर्शकता राखणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.एआयमुळे डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने बनावट फोटो, व्हिडिओ आणि आवाज तयार करून चुकीची माहिती पसरवणे, निवडणुकांवर प्रभाव टाकणे किंवा एखाद्या व्यक्तीची प्रतिमा मलिन करण्याच्या घटना वाढल्या आहेत. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन ईयूने नवीन नियम लागू केले आहेत.
 
 
 
labeling for AI-generated content
 
नवीन नियमांनुसार, जर एखादा फोटो, व्हिडिओ, ऑडिओ किंवा मजकूर पूर्णपणे एआयच्या मदतीने तयार करण्यात आला असेल, तर त्यावर 'एआय-निर्मित' (AI-generated) असे स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक असेल. तसेच, मूळ सामग्रीमध्ये एआयच्या साहाय्याने बदल करण्यात आले असतील, तर त्यावर 'एआय-आधारित सामग्री' (AI-based content) असा उल्लेख करणेही बंधनकारक असेल.याशिवाय, एखाद्या राजकीय नेत्याचा, सार्वजनिक व्यक्तीचा किंवा कोणत्याही महत्त्वाच्या घटनेचा एआयच्या मदतीने तयार केलेला व्हिडिओ किंवा ऑडिओ प्रसारित करताना तो कृत्रिमरीत्या तयार करण्यात आल्याची स्पष्ट माहिती देणे आवश्यक असेल. यामुळे नागरिकांची दिशाभूल होण्यापासून संरक्षण मिळावे, हा या नियमांचा मुख्य उद्देश आहे.
 
 
 
हे नियम केवळ फोटो आणि व्हिडिओंपुरते मर्यादित नाहीत. एखादी व्यक्ती एआय चॅटबॉट, व्हर्च्युअल असिस्टंट किंवा एआय एजंटशी संवाद साधत असल्यास, समोरची व्यक्ती नसून एआय प्रणाली आहे, याची माहिती आधीच देणे बंधनकारक करण्यात आले आहे. डिजिटल सेवांवरील विश्वास टिकवून ठेवण्यासाठी आणि वापरकर्त्यांमध्ये गोंधळ टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.भावनांचे विश्लेषण करणाऱ्या किंवा बायोमेट्रिक डेटाचा वापर करणाऱ्या एआय प्रणालींनाही हे नियम लागू असतील. अशा प्रणालींचा वापर कुठे आणि कोणत्या उद्देशाने केला जात आहे, याची माहिती संबंधित संस्थांना सार्वजनिकपणे द्यावी लागणार आहे. युरोपियन कमिशनने स्पष्ट केले आहे की, ज्या ठिकाणी महत्त्वाच्या निर्णयप्रक्रियेत एआयचा वापर होतो, तेथे पारदर्शकता अनिवार्य असावी.
 
 
नवीन नियमांमुळे एआय मॉडेल विकसित करणाऱ्या कंपन्यांवरही अतिरिक्त जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या आहेत. कंपन्यांना त्यांच्या मॉडेल्सची तांत्रिक माहिती जतन करावी लागेल, प्रशिक्षणासाठी वापरलेल्या डेटाचा सारांश सार्वजनिक करावा लागेल आणि कॉपीराइट नियमांचे पालन करावे लागणार आहे.या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर मोठा आर्थिक दंड आकारला जाऊ शकतो. गंभीर प्रकरणांमध्ये लाखो युरोंपर्यंतचा दंड होऊ शकतो, तर लहान आणि मध्यम उद्योगांसाठी त्यांच्या क्षमतेनुसार नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. मात्र, एआय उद्योगातील काही कंपन्यांनी या नियमांबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, अतिरिक्त नियम आणि कागदपत्रांमुळे नव्या तंत्रज्ञानाच्या विकासाचा वेग कमी होऊ शकतो आणि लहान डेव्हलपर्ससमोर अडचणी निर्माण होऊ शकतात. दुसरीकडे, युरोपियन युनियनचा दावा आहे की, एकसमान नियमांमुळे एआय क्षेत्रात विश्वासार्हता वाढेल आणि ग्राहकांचे संरक्षण अधिक प्रभावीपणे करता येईल.